बीड

राक्षसभूवन वाळू घोटाळा साठे बहाद्दर देखील रडारवर

Spread the love

गेवराईच्या महसूल कर्मचाऱ्यांसह खाजगी एजंटांवरही कारवाईची टांगती तलवार

 

गेवराई दि. १ (वार्ताहर) – राक्षसभूवन वाळू घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गेवराई महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून, खाजगी एजंटांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकूल लाभार्थ्यांच्या नावे सुमारे २० हजार ब्रासपेक्षा अधिक अतिरिक्त वाळूचे उत्खन करून त्याचे साठे तयार करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. ज्या जागेत अवैध साठा आढळून आला, त्या जमीनमालकांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वाळू माफिया आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन येथे जिल्हा प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हा अवैध वाळू उपसा सुरू होता. आमदार विजयसिंह पंडित यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. सुरुवातीला १०० कोटींच्या सिंडिकेटचा आरोप झाला होता, मात्र चौकशीत हा आकडा त्यापेक्षाही मोठा असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात शासनाची रक्कम वसूल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

चौकशीचा फेरा आता तालुक्यातील इतर गावांपर्यंत पोहोचला आहे. धुमेगाव, इरगाव, गंगावाडी, तलवाडा, बेलगाव, बागपिंपळगाव, इटकुर, एरंडगाव, जातेगाव, बेलगुडवाडी, उमापुर, गढी, किनगाव, म्हाळस पिंपळगाव, बाग पिमपळगाव,धोंडराई, राक्षसभुवन आणि पाटोदा तालुक्यातील भायाळा या गावांतील तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे गेवराई तालुक्यात खळबळ उडाली असून, अवैध वाळू उपसाला आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page