राक्षसभुवन प्रकरणातील 9 आरोपींचा जामीन फेटाळला

तथाकथित 100 कोटींच्या वाळू घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाचा दणका
बीड दि. 8 (वार्ताहर) गेवराई येथील बहुचर्चित राक्षसभुवनच्या 100 कोटींच्या वाळू घोटाळ्यातील आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातील 9 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज दि. 8 जुलै रोजी फेटाळण्यात आला आहे.
राक्षसभुवनच्या वाळू घोटाळ्यातील 19 दोषींविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरकुल लाभार्थ्यांच्या नावे वाळू उचलून बोगसपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील आरोपी तलाठी किरण दांडगे, गोविंद ढाकणे, पोलीस कल्याण पवार, कोतवाल शुभम गायकवाड, कंत्राटी कर्मचारी अभिजीत शेंबडे, शितल धोंडरे, योगेश मगर, गोविंद मगर व अन्य एका ने अटकपुर्व जामिन साठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायलयात धाव घेतली होती परंतू या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज आज बीडचे तिसरे विशेष सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला आहे.
सरकार पक्षाच्या वतीने विधिज्ञ अजय राख यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने वरील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.तसेच उर्वरित आरोपींपैकी बाबासाहेब सांगळे व सोहेल शेख यांच्या जामीन अर्जावर उद्या दि. 9 जुलै रोजी तर दादासाहेब माळी यांच्या अर्जावर दि. 14 जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.


