कूणाला वाचविण्याचे प्रयत्न?

मिरकाळ्यात घरकूल तपासणी पथकाकडून दिशाभूल
गेवराई दि ८ ( वार्ताहार ) तालुक्यातील घरकूल वाळू घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नियुक्त केलेल्या पथकांनी आजपासून गावोगावी जाऊन प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली आहे. काही तासांपूर्वीच नियुक्ती झाल्यानंतर हे पथक तालुक्यातील विविध गावांमध्ये दाखल होऊन इतर ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांचे फोटो आणि माहिती संकलित करू लागले आहेत.
मात्र या तपासणीच्या सुरुवातीलाच तालुक्यातील मिरकाळा येथे प्रकार समोर आला आहे. घरकूल लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी गेलेल्या पथकाला स्थानिक तलाठ्याच्या गणेशाने दिशाभूल केल्याची माहिती मिळत आहे. तपासणी पथकाला चुकीच्या ठिकाणी नेणे, अपूर्ण माहिती देणे आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू न देण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पथकावरही जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
गावातील काही तलाठ्यांचे जवळचे लोक आता तपासणी पथकाची दिशाभूल करण्याच्या कामाला लागले आहेत. पथक ज्या ठिकाणी जाते तेथे आधीच माहिती पुरवून मूळ लाभार्थी आणि प्रत्यक्ष परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाशी निगडीत असणारे काही लोक आता घरकूल धारकांना थेट धमक्या देऊ लागले आहेत. आपण जर तपासणी पथकाला खरे सांगितले किंवा अधिकाऱ्यांपुढे तक्रार केली, तर घरकूल रद्द होईल आणि इतर अडचणी निर्माण होतील, अशा स्वरूपाच्या धमक्या लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी घाबरून गप्प बसले आहेत.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की घरकूल योजना गरीबांसाठी आहे आणि त्यात गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मिरकाळ्यातील हा प्रकार पाहता आता तपासणी पथकाच्या कामकाजावरच देखरेख वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.


