चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान उत्साहात संपन्न
गेवराई दि १५ ( वार्ताहार ) चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास गावातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.निबंध स्पर्धेमध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्राथमिक गटातून तसेच माध्यमिक गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे :प्राथमिक गट :प्रथम – सृष्टी जितेंद्र सुळे द्वितीय – सिद्धांत मेघशाम पांचाळतृतीय – दिव्या धर्मराज मुटके माध्यमिक गट :प्रथम – प्रताप गोवर्धन चव्हाण द्वितीय – यश शरद पिंपळे तृतीय – माधुरी मच्छिंद्र हातागळे विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व ड्रॉइंग किट्स देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली.तसेच जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी येथे काही दिवसांपूर्वी कॉपीमुक्त चाचणी घेऊन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड झालेल्या १६ विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान भीमज्योती जन्मोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री. भाऊसाहेब लक्ष्मण शेळके यांनी भीमज्योती जन्मोत्सवाचे महत्त्व सांगत सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचे योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा. दीपक डोंगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचे आवाहन केले.विशेष व्याख्याते प्रा. शरद सदाफुले सरांनी विद्यार्थ्यांना अमूल्य प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच चव्हाणवाडी गावामध्ये बौद्ध समाजाचे एकही घर नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते, याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे विशेष कौतुक केले. सायरन वाजल्यानंतर गावातील मुले नियमित अभ्यासाला बसतात, ही शिस्त व अभ्यासू संस्कृती अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. सरग सर, चव्हाणवाडीचे पोलीस पाटील श्री. अंकुश हातागळे, जिल्हा परिषद शाळा तलवाडा येथील लिपिक श्री. विलास हातागळे, गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. रोहिदास पिंपळे, तसेच गावातील माता-भगिनी, विद्यार्थी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद यादव यांनी केले.