एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सतत आठ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
नाशिक दि 14 ( वार्ताहार ) – एकलव्य मॉडेल रेसिडेन्टशिअल स्कूल, अजमेर सौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक येथील विद्यार्थ्यांनी सतत आठ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. 13 एप्रिल सोमवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास केला.आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्टशिअल स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह ( दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल) साजरा करण्याबाबत कळवलेले आहे. सामाजिक समता सप्ताह आनंदात साजरा होत असतानाच दि. 13 एप्रिल 2026 सोमवार रोजी प्राचार्य सुरेश देवरे यांच्या संकल्पनेतून सतत आठ तास अभ्यास उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी शिक्षक अभय भांगे व स्वप्निल सुरवसे यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती.
त्यानुसार सोमवार 13 एप्रिल रोजी एकूण 155 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून स्वतःमधील संयम व शिस्त याचे अनोखे दर्शन दाखवून दिले. डिजिटल उपवास म्हणजे विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेट पासून काही तासासाठी दूर ठेवून वाचन संस्कृती बळकट करणे होय. एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये स्वईच्छेने सहभाग नोंदवून स्वतःच्या वाचनाबद्दलची आवड दाखवून दिली. विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथपाल रितु कुमारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगे महाराज व इतर महापुरुष यांची पुस्तके उपलबद्ध करून दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे या आठ तासात अभ्यासलेल्या पुस्तकांचे टिपण विद्यार्थ्यांनी काढले. निबंध स्वरूपात जमा केले. विद्यार्थ्यांच्या वाचन, लिखाण, शिस्त यातून उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. सतत आठ तास उपक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य सुरेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शिवशंकर कोंडागोरला, टार सिंग, स्वप्निल सुरवसे, आनंद दहिकर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शाळेचे शिक्षक टार सिंग व स्वप्निल सुरवसे यांनी विद्यार्थ्यासोबत सतत आठ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला. या उपक्रमदरम्यान वेळेची अचूक पद्धतीने शिस्त पाळण्यात आली. शाळेचे कर्मचारी विकास पवार, कल्याण पवार व रोहीत पवार यांनी अल्पोहार, बैठक व्यवस्था, प्रतिमा पूजन यांचे व्यवस्थापन पाहिले. उपक्रमाचे छायाचित्रण आनंद दहिकर यांनी केले. उपक्रमाच्या वेळेची समाप्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आणि आजच्या उपक्रमातून शांत, सुखद अनुभूती मिळाल्याची भावना व्यक्त केली. सतत आठ तास अभ्यास या उपक्रमाबद्दल बोलताना प्राचार्य सुरेश देवरे म्हणाले कि, वरिष्ठ कार्यालय राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती व आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग, नाशिक यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर कामकाज केले जाते. विदयार्थ्यांना महापुरुषांचे कार्य माहिती व्हावे. व त्यांच्यात वाचन संस्कृती रुजावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करावे व चिकित्सक वृत्ती स्वतः मध्ये बाळगावी यासाठी कटाक्षाने आम्ही प्रयत्न करतो. देशाच्या संविधानाला 75 वर्ष पुर्ण होत असताना आपला देश जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या भविष्याच्या आखणीत एकलव्य विद्यालयाचा विद्यार्थी आपले योगदान देईल याची खात्री वाटते.