काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन; बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार
गेवराई, दि. ९ (वार्ताहार) – माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे.
गेवराई, दि. १० रोजी सकाळी १० वाजता गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या परिसरातील शिवनगरी येथे सर्वधर्मीय संत, महंत व धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व संतांचा आदरपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास नारायणगडाचे महंत ह.भ.प. प्रेममूर्ती शिवाजी महाराज, भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज, चाकरवाडीचे महादेव महाराज, बंकटस्वामीचे लक्ष्मण महाराज मेंगडे, गोरक्षनाथ टेकडीचे नवनाथ महाराज, मत्स्येंद्रगडचे जनार्दन महाराज, गीता मंदिर पैठणचे विष्णू महाराज जगताप, रामकृष्ण बापू रंधवे, संभाजी महाराज, योगिराज महाराज, अखंडानंद गिरी महाराज, सुंदरसिंग महाराज, फादर विनोद कापसे, मुफ्ती मोईनोद्दीन, शब्बीर मौलाना, मुफ्ती गयासोद्दीन यांसह सर्वधर्मीय संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सोहळा समितीने केले आहे.



