गोळीबार प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार

गेवराई पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा; तिघांना अटक, दोघे फरार
गेवराई, दि. २९ (वार्ताहर) : काल रात्री गेवराई शहरातील संजय नगर भागात शेख मुसा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी शेख मुसा यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यासह तिघांना मध्यरात्री गेवराई पोलिसांनी अटक केली असून, या घटनेला प्रेमसंबंधाची किनार असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय नगर येथील रहिवासी शेख मुसा कटूमिया हे गेल्या चार वर्षांपासून शहरातीलच एका महिलेसोबत प्रेमसंबंधात होते. गेल्या चार दिवसांपासून ते संजय नगर येथील घरी पत्नी व मुलासोबत असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पाच जण आले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. त्यांनी शेख मुसा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मंगेश शिंदे याने शेख मुसा यांच्यावर गोळी झाडली, तसेच दोन राउंड हवेत फायर केले.
घटनास्थळी तात्काळ पोलीस हजर झाले. जखमीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तपासाची चक्रे गतिमान करत तात्काळ तिघा आरोपींना अटक केली. जखमीवर गेवराईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह अन्य एकजण फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दौंड हे करीत आहेत.


