माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांना यश

पैठण उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी अतिरिक्त पाणी पाळी सुटणार
छ. संभाजीनगर, दि. 28 ( वार्ताहार )
पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे सध्या जायकवाडी धरणात 60 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप यांची भेट घेऊन खरीप हंगामातील संरक्षणात्मक पिकांसाठी पैठण उजव्या कालव्यातून एक अतिरिक्त पाणी पाळी तातडीने देण्याची मागणी केली. जलसंपदा विभागाने त्यांची मागणी मान्य करत या आठवड्याच्या अखेरपर्यंत पैठण उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी अतिरिक्त पाणी पाळी सोडण्यास मान्यता दिली आहे. शुक्रवार, दि. 31 जुलैपर्यंत कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई विधानसभा मतदारसंघात पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते यांसह मशागतीवर मोठा खर्च केला आहे. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे जायकवाडी धरण 60 टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मंगळवार, दि. 28 जुलै रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप यांची भेट घेऊन खरीप हंगामातील संरक्षणात्मक पिकांसाठी जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून अतिरिक्त पाणी पाळी देण्याची मागणी केली. तसेच मौजे म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर यांसह गोदावरी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी शहागड कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या नादुरुस्त दरवाजांबाबत वारंवार केलेल्या तक्रारीची दखल घेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शहागड को.प. बंधाऱ्याच्या दरवाजांची दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी केली.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मागणीबाबत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करून जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास तत्त्वतः मान्यता दिली. या आठवड्यात शुक्रवार, दि. 31 जुलैपर्यंत पाणी पाळी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. शहागड को.प. बंधाऱ्याच्या दरवाजांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचनाही मुख्य अभियंता यांनी दिल्या.
यावेळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप, जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. 3 चे कार्यकारी अभियंता नखाते, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता नितीन हासे यांच्यासह जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी अतिरिक्त पाणी पाळी मिळणार असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून माजी आमदार अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.
