क्राईम

जून्या वादाचा वचपा

Spread the love

भरधाव स्कॉर्पिओने ४२ वर्षीय इसमाला उडवले, काही तासांतच आरोपी जेरबंद

 

गेवराई, दि. ३० (वार्ताहर) – जुन्या भांडणाच्या रागातून एका ४२ वर्षीय इसमाला चारचाकी स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

ताकडगाव येथील रहिवासी विजय जोंधळे (वय ४२) हे दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घराकडे जात असताना, कुसुम हॉस्पिटल जवळ एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पैशाच्या कारणावरून विजय जोंधळे यांनी एका व्यक्तीला मारहाण केली होती, या प्रकरणात त्यांना अटक होऊन ते जामिनावर बाहेर आले होते. याचाच राग मनात धरून आरोपी जीवन विठ्ठल साळवे (रा. गेवराई) याने हा कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी जखमी विजय जोंधळे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी जीवन साळवे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली. त्याला गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. ३१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि अण्णासाहेब पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page