वाळू माफीयात वर्चस्व वादाची लढाई

दोन गटात वाद, हवेत गोळीबार; गेवराईची बिहारकडे वाटचाल
गेवराई, दि. 19 (वार्ताहार): गेल्या काही महिन्यांपासून गेवराई पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाळू तस्करीला बळ दिले जात आहे. वर्चस्व वादातून वाळू माफियाच्या दोन गटात दि. 19 च्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या दरम्यान समोरासमोर बाचाबाची झाली. यातून एकाने हवेत गोळीबार केला. त्यामुळे गेवराई पोलिसांची अब्रू वेशीला टांगली जाऊ लागली आहे आणि गेवराईची बिहारकडे वाटचाल पहायला मिळत आहे.ही घटना म्हाळजपिंपळगाव फाटा याठिकाणी घडली आहे
गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू तस्करीच्या तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गेवराई पोलिसांचा छुपा पाठिंबा माफियांचे कल्याण करत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून “हम करे सो कायदा” अशी भूमिका गेवराई पोलिसांची आहे. त्यामुळे गुन्हेगारांनाही अधिकच बळ मिळत आहे.
वाळूच्या गाड्यांच्या वसुलीवरून दोन गट काल रात्री समोरासमोर भिडले. तसेच एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांचे नाकर्तेपण उघडे पडले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.



