बीड

जिल्हाधिकारी यांची गोदापात्रात ड्रोनव्दारे पहाणी 

Spread the love

घरकूल धारकांना दिलेल्या वाळूची चौकशी करण्यासाठी ४० जणांचे पथक नियुक्त 

 

गेवराई दि ८ ( वार्ताहार )  तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात घरकूल धारकांच्या नावे झालेला हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा आणि त्याची खुलेआम विक्री याप्रकरणी जिल्हा महसूल प्रशासनाने मोठी हालचाल सुरू केली आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी स्तरावर केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाने वेग घेतला असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः लक्ष घातले आहे.

राक्षसभूवनच्या गोदापात्राची आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ड्रोनद्वारे पाहणी करण्यास सुरुवात केली. ड्रोनच्या सहाय्याने पात्रातून किती क्षेत्रात उत्खन झाले आहे, कुठे अवैध रस्ते तयार करण्यात आले आहेत, आणि वाहने कोणत्या मार्गाने ये-जा करतात याची सखोल तपासणी केली जात आहे. या पाहणीतून मिळालेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओच्या आधारे संपूर्ण अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामुळे अवैध उपशाचा प्रत्यक्ष पुरावा प्रशासनाच्या हाती लागणार आहे.

घरकूल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांच्या नावे वाळू उचलल्याची नोंद महसूल विभागाच्या नोंदवहीत आहे, त्या सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चाळीस जणांचे विशेष पथक नेमले आहे. हे पथक चार गटांमध्ये विभागले जाणार असून प्रत्येक गटात दहा कर्मचारी काम पाहणार आहेत. पथकात मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक आणि ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्याला प्रत्यक्षात वाळू मिळाली का, मिळालेली वाळू त्याने घरकूल बांधकामासाठी वापरली का, घरकूल बांधकाम सुरू आहे का किंवा पूर्ण झाले आहे का, याची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काल अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी राक्षसभूवन परिसरात कारवाई करत सात हायवांवर कारवाई केली होती. या वाहनांमध्ये राक्षसभूवनमधून वाळू भरली जात होती आणि त्यांच्याकडे साष्टीपिंपळगावच्या टेंडरच्या पावत्या आढळून आल्या होत्या. मात्र याआधी चकलांबा पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले, याबतही आता चौकशी होणार आहे. राक्षसभूवनच्या गोदापात्रातून साष्टीपिंपळगावच्या टेंडरधारकाने कोणाच्या आशीर्वादाने अनधिकृत रस्ता केला आणि स्थानिक महसूल तसेच पोलीस यंत्रणा यामध्ये कशाप्रकारे सहभागी होती, याचा शोध घेतला जात आहे.

शासकीय टेंडरमधून दहा टक्के वाळू घरकूल लाभार्थ्यांना देण्याची कायदेशीर तरतूद असताना राक्षसभूवनच्या पात्रातूनच मोठ्या प्रमाणात उपसा करण्याचा अट्टहास का केला गेला, याबत परिसरात तीव्र चर्चा सुरू आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, घरकूल योजनेच्या नावाखाली मोठा घोटाळा करून माफियांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळवला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे की, घरकूल योजना ही गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे, त्यामुळे या योजनेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी आणि प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राक्षसभूवन परिसरातील वाळूमाफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणांच्या अडचणीत वाढ झाली आहे व या विषयी मोठी कार्यवाई होणार असल्याचे संकेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page