१०० कोटींचे सिंडीकेट; आमदाराची महसूल प्रशासनावर नाराजी

घरकूलाच्या नावावर सुरू अवैध असलेला वाळू उपसा तात्काळ बंद करावा – आ. विजयसिंह पंडित
गेवराई, दि. ६ (वार्ताहार): गेल्या आठवडा भरापासून शासनाचे नियमित वाळू ठेके सुरू असताना गेवराई महसूल प्रशासनाने राक्षसभूवन येथून घरकूल धारकांसाठी मोफत वाळू देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेवराईच्या वाळू माफियांनी १०० कोटींचे सिंडीकेट उभे केल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
गेवराई तालुक्यात बोरगाव, गुंतेगाव, सावरगाव असे मिळून ४ वाळू ठेके नियमित सुरू आहेत. त्याचबरोबर राक्षसभूवन-शनिचे येथे गेल्या काही दिवसांपासून घरकूल धारकांना मोफत वाळू देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही वाळू प्रत्यक्षात घरकूल धारकांपर्यंत पोहोचते का, असा प्रश्न आमदार पंडित यांनी उपस्थित केला आहे.
“घरकूलाच्या नावाखाली सुरू असलेला वाळू उपसा हा सरळ सरळ गैरव्यवहार आहे. यामागे १०० कोटींचे सिंडीकेट कार्यरत आहे. महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही संशय निर्माण होतो. याची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे विजयसिंह पंडित म्हणाले.
त्यांनी घरकूल लाभार्थ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी मोफत वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणीही केली आहे.



