क्राईम

सावळेश्वर गोदापात्रात लाच घेऊन वाळूचे हायवा सोडल्याचा आरोप

Spread the love

गेवराईच्या महसूल विभागाचे सोशल मीडियावर पितळ उघडे

गेवराई, दि. 11 (वार्ताहर): गेवराई तालुक्यात अवैध वाळू तस्करांनी थैमान घातले असताना सावळेश्वरच्या गोदापात्रात महसूल पथकानेच ‘माया’ गोळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच घेऊन वाळूचे हायवा सोडण्याची रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गेवराईच्या महसूल विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार संदीप खोमणे यांनी महसूलचे विशेष पथक तयार केले आहे. दि. 9 मे रोजी रात्री मंडळ अधिकारी परम काळे यांचे पथक सावळेश्वर येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी गोदापात्रात 12 हायवा उभ्या होत्या. मात्र, पथकाने एकावरही कारवाई न करता प्रत्येकी वाहनाकडून 7 हजार रुपये घेऊन वाहने सोडून दिल्याची चर्चा आहे.

सदर प्रकाराची एक रील्स सोशल मीडियावर फिरत आहे. “वाळू जंगलात वाळू माफियाच किंग आहेत” अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महसूल विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. तहसीलदार जागेवर नसल्याचा फायदा घेत पथकाने आपले खिसे गरम केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत तहसीलदार संदीप खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “प्रकरणाची मला माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास शासन नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”

अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी नेमलेलेच पथक जर लाचखोरी करत असेल तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page