सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत द्या – आ. विक्रम काळे

आ. सतीश चव्हाण विक्रमी मताधिक्याने विजयी होतील – मा आ.अमरसिंह पंडित
गेवराई, दि. १२ (वार्ताहार ) मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, यात कोणत्याही मनात शंका ठेवू नका. शिवछत्र परिवाराच्या संदर्भात होत असलेला अपप्रचार आणि संभ्रम दूर करून आ. चव्हाण यांच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.
कार्यकर्त्यांनी गाफील न राहता, प्रत्येक मत आ. सतीश चव्हाण यांना कसे मिळेल यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. विक्रम काळे यांनी केले.गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात आयोजित पदवीधर संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश भानुदास चव्हाण यांच्या प्रचारार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विक्रम काळे यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधला.
या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, रीपाईचे किशोर कांडेकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन बारगजे, रवींद्र खोड, जयदीप औटी, उपसभापती श्रीहरी पवार, माजी उपनगराध्यक्ष महेश दाभाडे, गटनेते खाजा शेख, कोचिंग क्लासेस संघटनेचे शिवाजी वराट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले, पदवीधरांसमोर रोजगारासह अनेक प्रश्न आहेत. उच्च शिक्षण घेऊनही अपेक्षित संधी मिळत नसल्याची खंत अनेक तरुणांच्या मनात आहे. त्यामुळे पदवीधर तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मत द्या.
आ. विक्रम काळे म्हणाले, शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. संचमान्यता आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या विषयांवर संघर्ष केला आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे यांनी केले. विष्णू खेत्रे, शिवाजी वराट, कालिदास नवले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर आभार प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी मानले.



