भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरण; न्यायालयात हजर करून बीडला आणणार

बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक
बीड, दि. 7 (वार्ताहार): बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर बीडला आणण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचाही समावेश असल्याची चर्चा होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार करत होत्या. त्या सध्या रजेवर असल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम. व्यंकटराम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर लातूरमधून अविनाश पाठक यांना ताब्यात घेतले. आज आरोपीला लातूरच्या न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर बीडला आणले जाईल. बीड येथील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग व इतर प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बनावट कागदपत्रे सादर करून तसेच जमिनीचे चुकीचे मूल्यांकन करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात अनेक अधिकारी, कर्मचारी व दलालांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.



