गेवराईत शारदा व्याख्यानमालेत गुंजन पाटील यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

केवळ पदव्यांसाठी नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयात या – कवयित्री गुंजन पाटील
गेवराई, दि. १३ ( वार्ताहार ) माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शारदा व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेवराई शहरात विचारांची चळवळ सुरू झाली आहे. या व्यासपीठावर कविता सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. कवितेमुळेच मला समाजाचे प्रेम मिळाले. महाविद्यालयीन युवक-युवतींनी केवळ कागदाच्या पदव्या मिळवण्यासाठी नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयात यावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी केले.
त्या ‘समाजासाठी साहित्य आणि संवादाचे महत्त्व’ या विषयावर बोलत होत्या. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शारदा व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी कवयित्री गुंजन पाटील यांनी गुंफले.
शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि र. भ. अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमरसिंह पंडित होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, शिव शारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात अमरसिंह पंडित यांनी व्याख्यानमालेमागील भूमिका स्पष्ट केली. या व्यासपीठातून उत्तम वक्ते आणि साहित्यिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कवयित्री गुंजन पाटील म्हणाल्या, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे माणसांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे आपल्या माणसांसाठी वेळ द्यावा, संवाद साधावा आणि आई-वडिलांच्या विचारांचा व संस्कारांचा आदर करून वाटचाल करावी. युवकांनी स्वतःमधील चांगल्या गुणांचा अभिमान बाळगावा. उत्तम वक्ता होण्यासाठी लेखन-वाचनाची सवय आवश्यक आहे. माणसातील माणुसकी जागवण्यासाठी साहित्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर गुंजन पाटील यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या प्रेमकवितांना ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. ‘मला आई व्हायचे नाही’ या कवितेने उपस्थितांना अंतर्मुख केले. सुमारे दीड तास रंगलेल्या या कार्यक्रमात टाळ्या, हास्य आणि ‘वन्स मोअर’च्या प्रतिसादाने गोदावरी सभागृह दुमदुमून गेले. महाविद्यालयीन युवक-युवतींसह नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह खचाखच भरले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर आभार प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी मानले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेला गेवराईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.



