आज जिल्हाधिकारी करणार राक्षसभूवन गोदापात्राची पाहणी

साष्टीपिंपळगावच्या टेंडरधारकाने गोदापात्रातून केलेला अवैध रस्ता कोणाच्या परवानगीने?
गेवराई, दि. ८ (वार्ताहार): तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातून हजारो ब्रास वाळू उपसा घरकूल धारकाच्या नावे उचलला गेला. याचं बिंग गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी फोडल्यानंतर जिल्हा महसूल प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.
आज जिल्हाधिकारी स्वतः राक्षसभूवन गोदापात्राची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. साष्टी पिंपळगावच्या टेंडरधारकाने राक्षसभूवनच्या गोदापात्रातून जो अनधिकृत रस्ता केलेला आहे, तो कोणाच्या आशीर्वादाने केला, याचं पितळही उघडं पडणार आहे.
राक्षसभूवनमध्ये १०० कोटींचे सिंडीकेट महसूल प्रशासनाने चालवले असल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर काल राक्षसभूवन परिसरात बीडचे अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी ७ हायवांवर कारवाई केली. ही वाहने राक्षसभूवनमध्ये वाळू भरत होती आणि त्यांच्याकडे साष्टीपिंपळगाव येथील पावत्या होत्या.
चकलांबा ठाणेदारांना ही बाब माहिती असूनही त्यांनी कारवाई केलेली नाही. राक्षसभूवनच्या गोदापात्रातून साष्टीपिंपळगावच्या टेंडरधारकाने कोणाच्या आशीर्वादाने रस्ता केला, याला स्थानिक महसूल आणि चकलांबा ठाणेदार जबाबदार आहेत, अशी चर्चा परिसरात आहे.
शासकीय टेंडरमधून १० टक्के घरकूल लाभार्थ्यांना वाळू देण्याची कायदेशीर तरतूद असताना राक्षसभूवन पात्रातूनच उपसा करण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीची स्थापना होणार असल्याचीही माहिती आहे.तसेच या समितीच्या स्तळ पाहणी अहवालाने महसूल व चकलांबा ठाणेदार सचिन इंगळे यांच्यावर कार्यवाई होण्याचे संकेत आहेत.



