गेवराई आणि बीड मधील विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा

स्व.अजितदादांच्या संकल्पनेतील विकास कामे पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार – आ. विजयसिंह पंडित
बीड, दि. १२ ( वार्ताहार ):राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा यांच्या माध्यमातून बीडकरांनी विकासाचे आशादायी चित्र पाहिले होते. स्व. अजितदादांनी अनेक विकास कामांना मंजुरी देत नवे विकासाचे व्हिजन लोकांसमोर मांडले होते. त्यांच्या संकल्पनेतील विकास कामे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. राजकारणापेक्षा विकासकामे महत्त्वाची आहेत, त्यामुळे स्व. अजितदादांच्या संकल्पनेतील विकासकामे पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई आणि बीडमधील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
आ. विजयसिंह पंडित यांनी सोमवार, दि. ११ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत गेवराई विधानसभा मतदारसंघासह बीड शहरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी रेशीम पार्क, गेवराई एमआयडीसी, आपत्ती सौम्यीकरणातील कामे, बीड एमआयडीसी, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास होत असलेला विलंब, बीड शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना, अर्धवट अवस्थेतील भुयारी गटार योजना, विज्ञान केंद्र व तारांगणाचे बांधकाम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नुतनीकरण, क्रीडा संकुल विकास आराखडा, स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक, मौजे कपिलधारवाडी गावाचे पुनर्वसन आदी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींच्या अनुषंगाने तपशिलाने चर्चा झाली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व बीड नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, गटनेते फारुक पटेल, नगरसेवक अशफाक इनामदार यांसह मान्यवरांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघासह बीड शहरातील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर यावेळी तपशिलाने चर्चा केली. गेवराई येथे उभारण्यात येणाऱ्या रेशीम पार्कच्या प्रस्तावित आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. स्व. अजितदादांनी त्यावेळी सांगितलेल्या प्रत्येक बाबींचा अंतर्भाव या आराखड्यात करण्याच्या सूचना आ. पंडित यांनी यावेळी दिल्या. मौजे आहेरवाहेगाव येथे गेवराई तालुका औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी आवश्यक जागा उद्योग विभागाकडे हस्तांतरित झाली असून विलंब न करता दोन महिन्यांत भूखंड वाटपाची प्रक्रिया करून अंतर्गत रस्ते, पाणी, वीज आदी बाबींची पूर्तता करण्यासंदर्भाने चर्चा झाली. माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित रस्ते, पूल, बंधारे व नदीकाठच्या गावांतील शेती आदींच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून सिंदफणा नदीवरील अंकुटा व खुंड्रस येथील संरक्षण भिंत, गोदावरी नदीपात्रात खामगाव आणि राजापूर येथे घाट बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय झाला.
बीड शहरासाठी सन २०१७ मध्ये मंजूर झालेली अमृत पाणीपुरवठा योजना अद्याप नगर परिषदेकडे हस्तांतरित झाली नसल्याबाबत सविस्तर चर्चा झाली. योजनेतील जलकुंभ बंद असून वितरण व्यवस्था अपूर्ण असण्यासह इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. सन २०१८ मध्ये १६५ कोटी रुपये किंमतीची भुयारी गटार योजना अर्धवट असतानाही कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची उचल केली. या दोन्ही योजनेतील कंत्राटदारांनी काम न करता शेकडो कोटी रुपये उचल केल्याचे निष्पन्न झाले. या बाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही करून पाणी व मलनिस्सारणाच्या संदर्भात नव्याने कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. बीड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफचे काम विलंबाने होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्ग आणि नाल्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. महामार्गाच्या अभियंत्यांकडून अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे बीड शहरातील पाण्याचा निचरा पावसाळ्यात होणार नाही, भविष्यातील या गंभीर अडचणींबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी खंबीर भूमिका घेत कंत्राटदारावर वेळेत काम न झाल्यास गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेताच नगरपालिका आणि महामार्गाच्या अभियंत्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नुतनीकरण, २५ कोटी रुपये किंमतीच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास आराखड्यातील कामे, विज्ञान केंद्र व तारांगणाचे बांधकाम, स्व. अजितदादा पवार यांच्या स्मारकाचे बांधकाम या सर्व कामांचा आढावा घेऊन लवकरच समारंभपूर्वक ही कामे सुरू करण्याचे नियोजन करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव यापूर्वी दिले असले तरी प्रत्यक्षात शासन दप्तरी त्याची नोंद नसल्यामुळे लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन याबाबतची तांत्रिक कार्यवाही करण्याचा निर्णय करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास कामांच्या आढाव्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतील विकास कामे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिणी पवार यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तोंडे, बीड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र पवार, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अतुल पाथरे, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ऋषिकेश चिरके, बीड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विशाल हात्ते, महामार्ग विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता आर्षद, नगर परिषदेचे अभियंता इपल्ली यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


