बीडकरांना नवी आशा

गेवराई मतदारसंघाच्या विकासाच्या गतीने बीडमध्ये विजयपर्व
बीड, दि. १२ (वार्ताहार): गेवराई मतदारसंघात विकास कामांचा धडाका पाहून बीड शहरालाही आता विकासाच्या विजयपर्वाची चाहूल लागली आहे. गेल्या चाळीस वर्षांत क्षीरसागर परिवाराला बीड शहरासाठी जे करता आले नाही, ते काम आ. विजयसिंह पंडित यांनी अवघ्या एक वर्षांच्या काळात मार्गी लावल्याची जोरदार चर्चा जिल्हाभरात रंगली आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हेच चित्र स्पष्ट झाले. गेवराईतील रेशीम पार्क, एमआयडीसी, आपत्ती सौम्यीकरणाची कामे जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश देतानाच, बीड शहरातील वर्षानुवर्षे रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना, 165 कोटींची अर्धवट भुयारी गटार योजना, राष्ट्रीय महामार्ग 361F चे संथगतीचे काम, विज्ञान केंद्र, क्रीडा संकुल, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नुतनीकरण यांसारख्या प्रकल्पांना आता ‘मिशन मोड’वर आणण्याचा निर्णय झाला.
क्षीरसागरांच्या काळात फक्त कागदावर राहिलेल्या योजना, पंडितांच्या काळात प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. अमृत योजनेत कंत्राटदारांनी काम न करताच शेकडो कोटी उचलले, भुयारी गटार योजना अर्धवट पडली. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. महामार्गाच्या कामात अडवणूक करणाऱ्या अभियंत्यांना समन्वयाचे आदेश दिले.
गेवराईत दोन महिन्यांत एमआयडीसीचे भूखंड वाटप, रेशीम पार्कचा आराखडा स्व. अजितदादांच्या सूचनेनुसार तयार करणे, अतिवृष्टीग्रस्त भागासाठी संरक्षण भिंती आणि घाट बांधकामाचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवणे, हे निर्णय गेवराईच्या विकासाचा वेग दाखवतात. हाच वेग आता बीडमध्ये आणण्याचा निर्धार आ.विजयसिंह पंडित यांनी बोलून दाखवला.
स्व. अजितदादांच्या संकल्पनेतील कामे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असे आ. विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचा विकासाचा पॅटर्न आता बीडमध्ये राबवला जाणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे.
चाळीस वर्षांच्या तुलनेत एक वर्षांचा वेग सरस ठरत असल्याने बीडकरांना आता खऱ्या अर्थाने ‘विकासाचे विजयपर्व’ अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


