अतिक्रमण धारकांना 15 मेपूर्वी हक्काचा पीटीआर मिळणार

मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक; जानेवारी 2011 पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित
गेवराई, दि. 5 (वार्ताहार): गेवराई शहरातील संजयनगर, इस्लामपुरा, साठेनगर, संतोषनगर, संघमित्रनगर, भीमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगरसह आदी भागांतील अतिक्रमणधारकांना हक्काचा पीटीआर वाटप करण्याच्या अनुषंगाने आज माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दि. 15 मे 2026 पूर्वी सर्व पात्र अतिक्रमणधारकांना पीटीआरचे वाटप करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
गेवराई शहरातील अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना हक्काचा पीटीआर वाटपाचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.अतिक्रमण धारकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती देऊन शहरातील सुमारे 2220 भूखंडधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यास दि. 30.10.2025 रोजीच्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्याचे काम यापूर्वी झाले आहे.
महायुती सरकारने दि. 25.03.2026 रोजी नवीन शासन निर्णय करून जानेवारी 2011 पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पक्की घरे आणि वाणिज्य प्रयोजनासाठीची अतिक्रमणे यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला.
नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ संथ झालेली प्रक्रिया आता वेगाने राबवली जाणार आहे. दि. 15 मे रोजी गेवराईमध्ये ‘राजस्व अभियान’ राबविण्यात येणार असून यामध्ये सर्व अतिक्रमणधारकांना पीटीआरचे वाटप करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र झालेल्या सर्व अतिक्रमणधारकांना भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 करून त्यांना हक्काचा पीटीआर देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासनाच्या नवीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने अतिक्रमणधारकांनी पुराव्यासह नगरपालिकेत अर्ज दाखल करावेत. प्राप्त अर्जांवर छाननी व इतर प्रक्रिया करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करून सर्व अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवरील सर्व पुरावे ग्राह्य धरण्याचा आग्रह या बैठकीत करण्यात आला. यापूर्वी झालेल्या बैठकीतील पात्र अतिक्रमणधारकांना वगळले असल्यास संबंधितांना कारणांसह लेखी पत्र द्यावे, असे निर्देशही देण्यात आले.
यावेळी मा आमदार अमरसिंह पंडित, आ विजयसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव, गेवराई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विक्रम मांडुरके, नायब तहसीलदार श्री. संजय सोनावणे, श्री. प्रदीप पुरी, नगररचनाकार श्री. आकाश राठोड, अभियंता श्री. रामेश्वर कर्डिले, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. जाधव, माजी नगराध्यक्ष श्री. महेश दाभाडे, नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते श्री. शेख खाजा, नगरसेवक श्री. दादासाहेब घोडके, झोपडपट्टी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. कडूदास कांबळे, श्री. श्रीकृष्ण मुळे, श्री. सतीश प्रधान, श्री. सदाफुले पाटील, श्री. जफर पटेल, श्री. प्रकाश गायकवाड यांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


