तलवाडा येथे उद्या अंत्यसंस्कार,

माजी पं.स. सदस्य बाबासाहेब आठवले यांचे अपघाती निधन
गेवराई, दि. 2 (वार्ताहार): तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय 50) यांचे गुरुवारी (दि.2 मे रोजी ) अपघाती निधन झाले.
गेवराईहून तलवाड्याकडे मोटारसायकलवरून जात असताना दैठण फाटा, सुतगिरणी जवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टाटा पिकअपने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाबासाहेब आठवले यांचा तलवाडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित व गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी अतिशय हळव्या भावनेने शोक व्यक्त केला. “बाबासाहेब आठवले यांच्या जाण्याने तलवाडा परिसरात पक्षाची मोठी हानी झाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. 3 मे रोजी तलवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आंदोलन लाईव्ह परिवार आठवले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.



