दोषीविरूद्ध कार्यवाईची मागणी

जिल्हा रुग्णालयात आरोपीचा मृत्यु
बीड दि.२८( वार्ताहार ) केज पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलेल्या तरुणाला जिल्हा रूग्णालयातील आरोपींच्या लॉकअपमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी आरोपी आशिष धिवार याचा लॉकअपमध्येच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
आशिष अशोक धिवार (वय २७) रा. काळेगाव घाट ता.केज याला केज पोलीसांनी पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक केली होती. सुरूवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाल्याने त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. काल सायंकाळी आशिष धिवार याची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातील लॉकअप वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल सायंकाळी उशिरा त्याचे नातेवाईक त्याला भेटूनही गेले होते. मात्र आज सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी आशिष धिवार याचा लॉकअपमध्येच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदरील घटनेची माहिती कळताच नातेवाईकांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी जिल्हा रूग्णालयाच्या कारभारासह केज पोलीसांनी केलेल्या मारहाणीवर संताप व्यक्त करत या प्रकरणात चौकशी करून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतली. केज पोलीसांनी पोलीस कोठडीत आशिष धिवार याला अतिशय अमानूषपणे मारहाण केली, घरापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत त्याला मारहाण करत आणण्यात आल्याचे आशिषच्या भावाने सांगितल्याचा आरोप चांदणे यांनी केला आहे. दरम्यान अजिंक्य चांदणे यांनी दुपारी उशिरा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. जिल्हा रूग्णालयातील लॉकअपमध्ये योग्य उपचार न मिळाल्यामुळे आशिषचा मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदरील रूग्णाच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा करणारे डॉक्टर व नर्स यांच्या कारवाई झाली पाहिजे. लॉकअपच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही बंद आहेत याची जबाबदारी कोणाची आहे? याचीही चौकशी करून तातडीने कारवाई करा अशी मागणी अजिंक्य चांदणे यांनी शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



