समर्थकांनी समाज माध्यमांवरील संभ्रम दूर करावा अमरसिंह पंडित यांचे आवाहन

पदवीधर निवडणुकीत आ.सतिष चव्हा विजयी चौकार मारतील – अमरसिंह पंडित
गेवराई, दि.1 ( वार्ताहार ) मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणुक घोषीत झाली आहे. आ.सतिष चव्हाण मागील तीन टर्म या मतदार संघाचे सक्षम प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदार संघातील 78 तालुके आणि दहा हजार गावांत त्यांचा जनसंपर्क आहे. विधान परिषद सभागृह आणि सभागृहाच्या बाहेरही त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे यावेळच्या पदवधीर निवडणुकीत आ. सतिष चव्हाण विजयी चौकार मारतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. समाज माध्यमांवर समर्थकांकडून उमेदवारी संदर्भात सुरु असलेली चर्चा थांबवून मतदारांमधील संभ्रम दूर करावा असे आवाहन त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उमेदवारीच्या संदर्भाने मागील अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. या बाबत अखेर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी स्वतःहून प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली असून पदवीधर निवडणुकीत आपण आ. सतिष चव्हाण यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या बाबत बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदार संघाची व्याप्ती मोठी असून यामध्ये 78 तालुके आणि सुमारे 10 हजार गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या एकीकडे खानदेशाच्या सिमेपासून कर्नाटक राज्याच्या सिमेपर्यंत तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेपासून तेलंगणा राज्याच्या सिमेंपर्यंत हा मतदार संघ पसरलेला आहे. या मतदार संघात मागील तीन टर्म आ. सतिष चव्हाण यांनी अफाट जनसंपर्क ठेऊन मतदार संघाची अभेद्य बांधणी केलेली आहे. त्यांच्या इतका जनसंपर्क असलेला दुसरा नेता सध्यातरी दिसत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मराठवाडा पदवीधर मतदार संघात चौथ्या टर्मसाठी आ.सतिष चव्हाण यांच्या उमेदवाराची घोषणा करणे केवळ औपचारीक बाब राहिली असून महायुतीतील नेते सर्वानुमते लवकरच या बाबतचा निर्णय घेऊन अधिकृत घोषणा करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे. अलिकडच्या काळात समाज माध्यमांवर सुरु असलेली चर्चा समर्थकांनी थांबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. आपण कधीही या मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी कोणतीही तयारी केली नाही अथवा पक्षाकडे उमेदवारीही मागितली नाही त्यामुळे समाज माध्यमांवर ही चर्चा का सुरु झाली? याची गुपीतही मला समजले नाही. मागील तीन दिवसांपासून मी काही महत्वाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये होतो, समाज माध्यमांवर ही चर्चा अधिक जोमाने सुरु झाल्यामुळे प्रसिध्दीपत्रकाद्वारे या बाबत जाणीवपूर्वक खुलासा करत असून आपण आ. सतिष चव्हाण यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात सांगितले आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रसिध्दीपत्रकामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघात त्यांच्या उमेदवारी बाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.



