गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडून उपाययोजनांची केली मागणी

Spread the love

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

गेवराई, दि. २६ ( वार्ताहार ) :राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातील सिरसदेवी, धर्मेवाडी आदी ठिकाणी पीक पाहणी दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून घाबरू नका, झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आ. विजयसिंह पंडित व माजी आ. अमरसिंह पंडित यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा व अडचणी त्यांच्यासमोर मांडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अवेळी व अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्यातील पीक पाहणी दौऱ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी भावनिक संवाद साधला. सिरसदेवी व धर्मेवाडी येथे त्यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्यासमवेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजेश विटेकर, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“धीर धरा, घाबरू नका. पावसाने दगा दिला असला तरी सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. येणाऱ्या काळात आपण पुन्हा उभे राहू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केल्याचे सांगून त्याअंतर्गत मिळणाऱ्या सवलती समजावून सांगितल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसोबतच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी, जलसंधारणाची कामे, मजुरांच्या हाताला काम, मनरेगा अंतर्गत कामे आदी नव्याने सुरू करून दिलासा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मौजे सिरसदेवी येथे त्यांनी रेशीम, सोयाबीन आणि कापूस उत्पादक महिला शेतकऱ्यांशी भावनिक संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page