शारदा व्यख्यानमालेतून विचारांची चळवळ गतीमान व्हावी – मा.आ.अमरसिंह पंडित

जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन भारत देश पाहिला पाहीजे – दंगलकार नितीन चंदनशिवे
गेवराई, दि. २६ ( वार्ताहार ) :मानवतावाद हीच देशाची गरज असून सर्वांनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन भारत देश पाहिला पाहिजे. भारतीय म्हणून एकत्र येऊन एकमेकांचा आदर केला पाहिजे, संविधान वाचणे, वाचविणे आणि जगणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक नितीन चंदनशिवे यांनी केले.
गेवराई येथे शारदा प्रतिष्ठान आणि र. भ. अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता चंदनशिवे यांनी गुंफले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून व आ. विजयसिंह पंडित यांच्या आयोजनातून स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीपासून या व्याख्यानमालेस सुरुवात झाली आहे.
प्रास्ताविकात अमरसिंह पंडित म्हणाले, तरुणांमध्ये वैचारिक प्रगल्भता यावी, विचारवंतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ही अराजकीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
व्यासपीठावर आ. विजयसिंह पंडित, जयसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, किशोर कांडेकर, कालिदास नवले, जालिंदर पिसाळ, कुमारराव ढाकणे, जगनपाटील काळे, जगन्नाथ शिंदे, रणवीर पंडित, गजानन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या खास शैलीत चंदनशिवे म्हणाले, समाजकारण्यांनी संत गाडगेबाबांचा खराटा आणि राजकारण्यांनी संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हाती घेतली तर लोकशाही अधिक मजबूत होईल. पैसे घेऊन मतदान केले त्याच दिवशी लोकशाहीचा खून होतो. छत्रपती शिवाजी महाराज मनगटात घट्ट, बाबासाहेब आंबेडकर मेंदूत फिट्ट झाले की गांधी हातात येतात, असे सांगत त्यांनी ‘थांबा, शांत रहा, डोळे उघडे ठेवून पहा’ असा संदेश दिला.
‘आमचा कांबळे’ ही कविता सादर करून त्यांनी टाळ्या मिळविल्या. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर आभार प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


