क्राईम

एका आरोपीला पकडल्याने सिंडिकेटचे रॅकेट उघड होणार असल्याचे संकेत

Spread the love

राक्षसभुवन वाळू घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे केली गतिमान

 

गेवराई, दि. 2 (वार्ताहर) गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन कथित वाळू घोटाळा प्रकरणाचा तपास बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्याने मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला त्यांनी ताब्यात घेतले असून त्याने अनेकांची नावे उघड केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सिंडिकेट प्रकरणातील अनेक वाहने व आरोपींची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन परिसरात जिल्हा महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता राक्षसभुवन परिसरातील गोदापात्रातून सुमारे 22 हजार ब्रास वाळूचा उपसा झाल्याची माहिती चौकशी दरम्यान उघडकीस आली. तसेच स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांनी तहसिलदार संदीप खोमणे यांच्या माध्यमातून हे सिंडिकेट चालवले जात असल्याची तक्रार दिल्यानंतर जिल्हा महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.

यामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु यामध्ये तहसिलदार संदीप खोमणे यांचे नाव वगळल्याने जिल्हा महसूल प्रशासनाबाबत मोठा संशय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत. तसेच या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने अनेक वाहनधारकांना नोटीस देऊन खुलासा मागवला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत आहेत.

सर्व 743 हायवाच्या खेपा मारल्या असून त्यापैकी 243 खेपांमध्ये अपहार झाला असल्याची बाब जिल्हा प्रशासनासमोर आली आहे. उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून काही दिवसांतच या संपूर्ण सिंडिकेटवर कारवाई होणार असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page