सामाजिक

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त आयोजित मोफत कृत्रिम हातपाय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

निराधारांना आधार देणे हेच स्व. अजितदादांना खरे अभिवादन — आ. विजयसिंह पंडित

 

गेवराई, दि.26 ( वार्ताहार ) महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग आणि निराधार बांधवांना आधार देण्यासाठी आयोजित करण्यात आले मोफत कृत्रिम हातपाय शिबिर हे समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा उपक्रमांतूनच स्व. अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केले जात आहे, असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. ते शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, गेवराई येथे आयोजित मोफत कृत्रिम हातपाय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शारदा प्रतिष्ठान, साधू वासवानी मिशन, पुणे आणि शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. २६ जुलै रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन्नाथ काळे, शहराध्यक्ष दीपक आतकरे, उपसभापती श्रीहरी पवार, भवानी बँकेचे संचालक उत्तमराव सोलाने, दत्ता दाभाडे, माजी नगरसेवक शाम येवले, रिपाइंचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, शैलेश तोष्णीवाल, अवेजशेठ, विलास ठाकूर, शारदा हॉस्पिटलचे कार्यालयीन अधीक्षक डॉ. अजयसिंह पंडित, साधू वासवानी मिशनचे डॉ. सुशील ढगे, मिलिंद जाधव, सलील जैन, जितेंद्र राठोड, राहुल सरोज, संजय जाधव, ज्ञानेश्वर पाटील, अक्षय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी व कृत्रिम हात-पायासाठी आवश्यक मोजमाप घेण्यास प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले. त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करत अशा सेवा उपक्रमांमुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात नवी आशा निर्माण होत असल्याचे सांगितले.

साधू वासवानी मिशनचे डॉ. सुशील ढगे यांनी मनोगत व्यक्त करताना शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांसाठी सातत्याने कृत्रिम हातपाय शिबिरांचे आयोजन करून अनेक गरजू व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य केले असल्याचे नमूद केले.

या शिबिरासाठी गेवराई तालुका आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या १४२ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. दिवसभर लाभार्थ्यांची तपासणी, मोजमाप व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच त्यांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शारदा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक, शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच साधू वासवानी मिशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजातील गरजू, दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक विचारांना साजेसा हा सेवा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page