राक्षसभूवन वाळू घोटाळ्यातील सूत्रधार असल्याचा आरोप

जिल्हाधिकारी सुनावणीनंतर अचानक रजा; १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार
गेवराई दि. १३ (वार्ताहर) – राक्षसभूवन येथील अवैध वाळू उपसा प्रकरणात नाव आले गेवराईचे वादग्रस्त तहसिलदार संदिप खोमणे यांनी जिल्हाधिकारी सुनावणीनंतर २५ जूनपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी कामासाठी रजा घेतल्याचे त्यांनी कळवले आहे.
काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर हा घडामोडीला वेग आला. घरकूल लाभार्थ्यांच्या नावे अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी खोमणे यांचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्त कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांचे निकटवर्तीय असले एक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले. यावेळी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. दरम्यान एका तलाठ्याने मेडिकलचे कारण देत सुनावणीला दांडी मारल्याची बाबही समोर आली.
या प्रकरणी महसूल विभागातील १५ कर्मचाऱ्यांवर कोणत्याही क्षणी निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तहसिलदार खोमणे यांच्यावरील कारवाईचे संकेत स्पष्ट होताच त्यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पत्करल्याने प्रकरणाला आणखी संशयाची किनार मिळाली आहे.



