ब्रम्हगाव याठिकाणची घटना

बंजरग बलीच्या मूर्तीची विटंबना; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
गेवराई, 29 मे: गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील ब्रम्हगाव येथे बजरंग बलीच्या मंदिरातील मूर्तीवर मांस टाकून विटंबना केल्याची घटना आज उघडकीस आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ब्रम्हगाव येथील बजरंग बली मंदिरात आज सकाळी अज्ञात व्यक्तीने दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मूर्तीवर मांस टाकल्याचे समोर आले. या प्रकारामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने कारवाई सुरू केली. त्यांनी आरोपीला लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कुणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू नये, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा आणि शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



