गेवराईच्या 15 वाळू माफियांवर गोंदी पोलिसांत गुन्हा

एसपी नवनीत कॉवत यांच्या ‘झिरो टॉलरन्स‘ आदेशाला गेवराईच्या ठाणेदाराकडून हुलकावणी
गेवराई, दि. 7 (वार्ताहार):गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजरोसपणे अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी असताना गेवराई पोलीस मात्र मूग गिळून गप्प होते. अखेर शेजारच्या गोंदी पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत गेवराईतील 15 वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे गेवराई पोलिसांची मोठी नाचक्की झाली असून, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशालाही गेवराईच्या ठाणेदाराकडून हुलकावणी मिळत असल्याची संतप्त चर्चा तालुक्यात सुरू आहे.
गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील सावळेश्वर व म्हाळज पिंपळगाव मार्गे पलीकडे अंबड तालुक्यातील गोरी, गंधारी आणि डोमलगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्राचे लचके तोडून रात्रीच्या अंधारात वाळूने भरलेले हायवा आणि ट्रॅक्टर गेवराई हद्दीतून बिनधास्त जातात. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना हा उपसा सुरू असून, याच 15 जणांविरोधात गोंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 व 19 एप्रिल, 22 एप्रिल 2026 तसेच 04 मे 2026 रोजी व त्यापूर्वी झालेल्या अवैध उत्खनन प्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303, 3(5) व इतर कलमांन्वये हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करत आहेत.
1) हरी रघुनाथ सुखदेव, 2) अंकुश पवार, 3) वैभव डाके, 4) शिवाजी पंडित डाके, 5) रमेश सुखदेव, 6) राजेंद्र बब्रुवाहन डाके, 7) किरण डाके, 8) अशोक सुखदेव, 9) पवन पठाडे, 10) रवि टेकाळे, 11) अजय पठाडे, 12) बंटी उदे, 13) मुकेश कुटे, 14) शाहरुख अनवर शेख, 15) प्रवीण राऊत (सर्व रा. माळस पिंपळगाव, सावळेश्वर, ता. गेवराई व भांबेरी, ता. अंबड)या 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज रात्री 50 ते 60 हायवा अवैध वाळू घेऊन जात असताना गेवराई पोलिसांकडून एकही मोठी कारवाई होत नाही. मात्र, याच माफियांवर शेजारच्या गोंदी पोलिसांनी धडक कारवाई केल्याने गेवराई पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांचा थेट आरोप आहे की, या अवैध वाळू तस्करीला पोलिसांचा छुपा पाठिंबा आहे एसपी नवनीत कॉवत यांनी ‘झिरो टॉलरन्स’ ची भूमिका घेऊन वाळू माफियांवर कारवाईचे आदेश देऊनही गेवराईचे ठाणेदार त्याला जुमानत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. ‘ठाणेदार आणि त्यांचे बंगलबच्चे यांच्या मार्फत दरमहा मोठी वसुली होते, म्हणूनच माफियांवर कारवाई होत नाही’ अशी उघड चर्चा तालुक्यात आहे.
एकीकडे गोदावरी नदीपात्राचे अक्षरशः वाळवंट होत असताना, भूजल पातळी खालावत असताना गेवराई पोलीस प्रशासनाची डोळेझाक संशयास्पद ठरत आहे. या बेकायदेशीर उपशामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता एसपी नवनीत कॉवत या प्रकरणी गेवराईच्या ठाणेदाराची विभागीय चौकशी करून काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



