क्राईम

आठ महिन्यांपूर्वी दाखल गुन्ह्यात पोलिसांना यश

Spread the love

मिसिंगचा बनाव, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढला

 

गेवराई, दि. 3 (वार्ताहार): कौटुंबिक वादातून पत्नीने मेव्हणी व साडूच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना 8 महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. गेवराई पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून हा गुन्हा उघड केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

दि. 3 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उद्धव तुकाराम शिंदे (वय 50) व त्यांची पत्नी संगीता हे पुण्याहून दुचाकीवरून गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे नातेवाईक सविता विष्णू वाजे व विष्णू कोंडीबा वाजे यांना भेटण्यासाठी आले होते. उद्धव शिंदे पत्नीला नेहमी त्रास देत व मारहाण करत होता. दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा वाद झाल्याने संगीता शिंदे हिने बहीण सविता व भाऊजी विष्णू वाजे यांच्या मदतीने उद्धव शिंदे याचा गळा आवळून खून केला.

खून केल्यानंतर विष्णू वाजे याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह जवळच्या ऊसाच्या शेतात टाकला. प्रेताची दुर्गंधी येऊ लागल्याने दोन-तीन दिवसांनी मृतदेह गोणीत भरून मोटारसायकलवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी मृताची मोटारसायकलही त्याच पुलावरून नदीपात्रात टाकली.

मिसिंगची तक्रार ठरली बनाव
मुख्य आरोपी पत्नी संगीता शिंदे हिने पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दि. 2 मे 2026 रोजी पुणे पोलिसांचा एक अंमलदार व मृताचा मुलगा शुभम शिंदे गेवराई पोलीस ठाण्यात आले. शुभमने वडिलांबाबत घातपाताची शंका व्यक्त केल्याने पो.नि. किशोर पवार यांनी वरिष्ठांना माहिती देऊन तपास सुरू केला.

पोलिसांनी विष्णू वाजे व सविता वाजे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन अल्पवयीन मुलांकडेही पालकांसमक्ष चौकशी करण्यात आली. मुख्य आरोपी संगीता शिंदे हिला पुणे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

मृताचा मुलगा शुभमच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 268/2026, कलम 103(1), 238, 66(2) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल आहे. तपास सपोनि दीपक लंके करीत आहेत. आतापर्यंत 3 आरोपींना अटक झाली असून, गोदावरी नदीत फेकलेल्या मोटारसायकलचा सांगाडा मिळाला आहे.असून 

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर पवार, सपोनि दीपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, अण्णासाहेब पवार व इतर पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page