गेवराई

वाढदिवस विषेश

Spread the love

लोकनेते आबा..!

 

पंचायत समितीच्या आवारातल्या कापसे आप्पांच्या हॉटेलात, मोडक्या-तोडक्या बाकड्यावर बसून लोकांच्या हाकेला “ओ” देणारा एक सरळ-साध्या स्वभावाचा तरुण नेता पुढे आमदार, मंत्री होईल, अशी साधी कल्पना सुद्धा कोणी केली नसेल. हे नव्या पिढीला सुद्धा नवल वाटेल. राजकारणातल्या वखवखलेल्या वाटा तुडवून ते निश्चयपूर्वक चालत राहिले. लोकसेवक म्हणून उत्तम समन्वय साधून काम करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यावर त्यांची राजकीय इनिंग अगदी भन्नाट सुरू झाली. गोरगरीबांची गाऱ्हाणी ऐकून घेणारा सर्वसामान्य कार्यकर्ता लोकनेता झाला. अशा दैदीप्यमान राजकीय इतिहासाची साक्ष देणारा वारसा श्री. बदामराव लहुराव पंडित यांच्या रूपाने पुढे आला. लोकांसाठी ते ‘आबा’ कधी झाले ते कळलेच नाही. त्यांच्यासारखा नशीबवान नेता शोधून सुद्धा सापडणार नाही. पस्तीस-चाळीस वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत.

प्रसिद्ध कवी शिवमंगल सिंह ‘सुमन’ यांची एक सुंदर कविता आहे – ‘क्या हार में, क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष के पथ पर जो मिला..! यह भी सही, वह भी सही..!’ अगदी या ओळीला साजेशा अशा विविध अंगांनी नटलेल्या आबांच्या व्यक्तिमत्त्वावर लोकांनी जीव ओवाळून टाकला. त्यांनीही नैसर्गिक स्वभावाशी छेडछाड न करता, जसे आहेत अगदी तसेच ते वागले. त्यांचे फोनवरून बोलणे, चालणे नॅचरल होते. त्यांना घोळक्यात राहून काम करायला आवडायचे. खरं म्हणजे ते एक कसब होते. नाही म्हटले तरी ती गॉड गिफ्ट होती. त्यांनी आमदारकीच्या पहिल्या दोन टर्म पायाला भिंगरी लावून काम केले.

सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे ट्रॅक्स गाडी होती. त्या गाडीचे दरवाजे काढून ठेवावे लागत होते. ‘हात दाखवा आणि गाडी थांबवा’, हे नवीन सूत्र राजकारणात आले ते फक्त आबांमुळेच..! आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ द्यायचा नाही. विरोधक आहे म्हणून नाहक त्रासही द्यायचा नाही. ही मूल्ये सांभाळून त्यांनी राजकीय सुसंस्कृतपणा जपला.

चाळीस वर्षांच्या कालखंडातही आबांचे राजकीय वलय टिकून आहे. त्यांना अगदी सहज, फारशी आदळआपट न करता राजकीय पदे मिळत गेली. धोंडराई, ता. गेवराई, जि. बीड या मतदारसंघातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य म्हणून येण्याचा मानही त्यांना मिळाला. बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा आमदार, एकदा राज्याचा मंत्री, असा चढता आलेख त्यांच्या पुढ्यात आला आणि तो उंचावत गेला.

आबांना जीवाभावाची माणसे मिळत गेली. कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. आबांचा स्वभाव सरळ रेषेतला होता. जे पोटात तेच ओठात, आडपडदा न ठेवता राजकारण केले. जमेल तशी मदत करायची, कार्यकर्त्यांना जीव लावायचा; त्यांच्या सुख-दुःखात जायचे. कार्यकर्त्यांसाठी थेट भिडायचे. त्यांच्या प्रश्नांना थेट हात घालायचा. गावच्या सार्वजनिक अडचणींवर उपाय शोधायचे. या दृष्टिकोनातून त्यांचे राजकारण, समाजकारण होते. ‘मतदारसंघातील जनतेची नाडी ओळखणारा नेता’, अशी नवी ओळख आबांच्या कर्तृत्वाने जनमानसात उभी राहिली होती.

त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्याने बीडच्या राजकारणात भूकंप झाला. तोपर्यंत आबांची सामाजिक उंची वाढलेली होती. ते प्रचंड लोकप्रिय नेते झाले होते. गेवराईच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकून घेतले. आपल्या उपजत गुणांच्या जोरावर त्यांनी गेवराई, जि. बीड मतदारसंघातील जनतेच्या मनावर अजातशत्रू म्हणून अधिराज्य गाजवले आहे.

खरं म्हणजे आबांचा राजकीय पटलावरचा प्रवास समाजकारणातून झाला आहे. गेवराई शहरात पंचायत समितीच्या आवारात कापसे आप्पांच्या हॉटेलात बसून आबांनी लोकांची कामे केली. त्यांना वेळ दिला, गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात आले. ऐन तारुण्यात असतानाचा तो काळ होता. आबा एकदम हिरोच होते. प्रभावसूचक आणि राजबिंडे व्यक्तिमत्त्व म्हणून आबांच्या अवतीभवती तरुणांचा घोळका असायचा. निवडणुकीत आबांची ताकद दादांना मिळायची.

1993 च्या आधी बदामराव पंडित यांनी स्वतंत्र भूमिकेतून राजकीय पटलावर यावे, असा आग्रह वाढत गेला. सामाजिक दबाव वाढल्याने, मित्रांच्या आग्रहाखातर आबांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला. पंडितांची भाऊबंदकी दोन गटात विभागली. आबांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहीर करून माजी मंत्री शिवाजीराव पंडित उर्फ दादांना विरोध केला. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बदामराव पंडित अपक्ष उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तत्कालीन राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांचा धक्कादायक पराभव झाला.

आबा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे त्यांना अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. अदृश्य राजकीय शक्तींचे पाठबळ आणि जनसामान्यांच्या पाठिंब्यावर ते आमदार झाले. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजपा युतीला कौल दिला होता. अपक्षांसह लहान-मोठ्या पाठिंब्यावर युतीची सत्ता आली. आबांनी गोपीनाथराव मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून सरकारला पाठिंबा दिला. मुंडे साहेबांनी आबांच्या लोकप्रियतेचा आदर करून त्यांना लाल दिव्याची गाडी दिली. मंत्रीपदाच्या सरप्राईजमुळे गेवराईच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. आबा महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री झाले.

युतीच्या काळात त्यांनी गेवराई मतदारसंघात विकासाची कामे केली. गोरगरीब कार्यकर्त्यांना जीव लावला. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. गोदाकाठच्या डांबरी रस्त्याचे प्रश्न निकालात काढण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गेवराई शहरातल्या मतदारांनी नेहमीच आबांना आणि गेवराईच्या पाटलांना साथ दिली. आबा तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्या विजयात गेवराईचा वाटा तेवढाच मोलाचा होता. गेवराईचे मतदान दोन-तीन सर्कलच्या बरोबरीचे असायचे. त्यामुळे आबांच्या मताधिक्याचा पाठलाग करताना विरोधी उमेदवाराची दमछाक व्हायची.

1995, 1999 अशा सलग दोन विधानसभेत ते निवडून आले. त्यांची हॅटट्रिक हुकली. 2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित हे आमदार झाले. तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. पुन्हा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आबांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा पराभव करून बाजी मारली होती. गेवराईच्या राजकारणात अचानक ट्विस्ट पहायला मिळाला होता.

एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहणारे दादा आणि आबा एकाच व्यासपीठावर आले. झाले गेले विसरून दोन्ही पंडित एकत्र आल्याने राजकीय दिलजमाई झाली. भाजपाला माणूस सापडेना. म्हणून मग गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ऐनवेळी बाळराजे पवार यांना भाजपात प्रवेश दिला. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बदामराव पंडित आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. लक्ष्मणराव पवार यांच्यात सामना झाला. मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला. गेवराईचे पाटील ॲड. लक्ष्मण आण्णा पवार आमदार झाले. एकत्र आल्याने दोघांचेही राजकीय नुकसान झाले होते. आजही त्या निर्णयावर चर्वितचर्वण होत राहते. मात्र, तो भूतकाळ झाला आहे.

आबांची एक खासियत राहिली, त्यांनी विजयाचा कधी उन्माद केला नाही आणि पराभवाने ते कधीही खचले नाहीत. पराभव झालेल्या दिवशीच ते शहरातल्या मारुती मंदिरात दर्शन घ्यायला गेले होते. ज्यांनी तीनदा निवडून दिले, त्यांनीच पाडले. त्यामुळे राग कशाला धरायचा. यश-अपयश येत असते. त्यांचा हा स्वभाव त्यांना आणखी उंचीवर घेऊन जातो. चाळीस वर्षांपासून ते राजकारणात आहेत. ते कुठेही गेले तरीही मुंडे घराण्याशी ऋणानुबंध कायम ठेवून, मुंडे साहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवणारा एक भला माणूस म्हणून आबांची कारकीर्द लक्षवेधक राहिली आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही.

आबांच्या आजवरच्या राजकीय, सामाजिक उत्कर्षात त्यांच्या पत्नी सौ. गिरीकाभाभी बदामराव पंडित यांचा भक्कम आधार, मोलाची साथ लाभली. अनेक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा उचलला. आबांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव जि.प.चे सभापती युद्धाजीत दादा पंडित, यशराज भैय्या पंडित यांच्या खांद्यावर आहे.

आबांनी चाळीस वर्षांच्या राजकारणात पेशन्स ठेवून काम केले. यश, अपयश पाहिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. प्रसिद्ध शायर कैफी लिहितात, ‘बैठ जाता हूं अक्सर मिट्टी पर, क्यूं की मुझे अपनी औकात अच्छी लगती है..!’ आबा, आपणास दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना. आभाळभर शुभेच्छा..!

सुभाष सुतार,पत्रकार
गेवराई-बीड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page