मुस्लिम समाजाने अपप्रचाराला बळी पडू नये

अमरसिंह पंडित हेच मुस्लिम बांधवांसाठी सर्वसोयीयुक्त शादीखाना उभारणार: जे.के. बाबू
गेवराई दि ३० ( वार्ताहार ) तालुक्याचे लोकप्रिय नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मुस्लिम समाजाला सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गेवराई शहरातील मुस्लिम बांधवांचा शादीखान्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याची दखल घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विजयसिंह पंडित यांनी भव्य शादीखाना उभारण्यासाठी भरीव निधी मंजूर करून आणला. तांत्रिक अडचणीमुळे कामास विलंब होत आहे, याचा गैरफायदा घेऊन काही लोक अपप्रचार करत आहेत. मुस्लिम समाजाने त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्यकर्ते जे.के. बाबुभाई यांनी केले.
जे.के. बाबू पुढे म्हणाले की, गेवराईत लग्नासाठी कोंडवाड्यासारखी छोटी जागा असल्याने वधू पक्षाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन अमरसिंह पंडित यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. काम सुरू झाल्यावर आणखी दोन कोटींचा निधी मिळणार असून, एकूण पाच कोटींपर्यंत हे काम जाणार आहे.
शादीखान्यासाठी अमरसिंह पंडित यांनी एक वर्षापूर्वी मुजीब पठाण व मुस्लिम कार्यकर्त्यांसह बीड शहरातील कोहिनूर लॉन्स, किंग पॅलेस, ताज फंक्शन हॉल, जी.एन. फंक्शन हॉल आदींची पाहणी केली. अनेक बैठका घेऊन तय्यब नगर येथेच शादीखाना उभारण्याचा एकमताने निर्णय झाला व भूमिपूजनही झाले.
मात्र, ज्या जागेवर शादीखाना उभारायचा आहे ती जागा अद्याप मोकळी झालेली नाही. सदर जागा दारूल उलूमचे मुफ्ती मोईनोद्दीन कासमी व मेन रोड अत्तार समाजाच्या देखरेखीखाली आहे. भूमिपूजनापासून आम्ही दर आठवड्याला मुफ्ती कासमी यांना भेटून जागा मोकळी करण्याची विनंती करत आहोत. परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचे दिसते.
“मुफ्ती कासमी यांच्यावर राजकीय दबाव आहे का? समाजाचा दबाव आहे का? जागा मोकळी का होत नाही? केवळ विरोधासाठी अमरसिंह पंडित यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय का?” असा सवाल जे.के. बाबू यांनी उपस्थित केला.
कामाची मुदत संपूनही अमरसिंह पंडित यांनी मुदतवाढ करून आणली आहे. तरीही जागा मोकळी होत नाही. यात चूक कोणाची, हे समाजाने मुफ्ती कासमी यांना विचारावे, असेही बाबुभाई म्हणाले.
“ज्या ज्येष्ठ पत्रकारांनी टीका केली, त्यांनाच दारूल उलूमच्या बॉडीत घेतले नव्हते, तेव्हाही त्यांनी मुफ्ती कासमी यांच्याविरोधात बातम्या केल्या होत्या. आता त्यांनीच पुढाकार घेऊन जागा मोकळी करून द्यावी,”असे आवाहन जे.के. बाबू यांनी केले. अमरसिंह पंडित शादीखाना उभारणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असेही ते म्हणाले.



