
फार्मर आयडी दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – आ. विजयसिंह पंडित
बीड, दि.29 ( वार्ताहार ) फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटींमुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा आ. विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडला. आ.पंडित यांच्या लक्षवेधी सूचनेमुळे प्रशासन कामाला लागले असून अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मधील दोष व त्रुटी दूर झाल्या आहेत. महिनाभरात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी दुरुस्त करून देण्याचे आश्वासन कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांनी दिले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडीमधील दुरुस्तीसाठी तहसिलदार किंवा तलाठी कार्यालयात तात्काळ अर्ज करावेत असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
आ. विजयसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक असून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी तो महत्वाचा ठरत आहे. सन २०२३ मध्ये बीड जिल्ह्यात फार्मर रजिस्ट्री पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. त्या माध्यमातून सुमारे २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आले यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीवर सरसकट १.९९ हेक्टर क्षेत्राची नोंद झाल्यामुळे हे शेतकरी शासन योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची बाब आ. विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिली. आ. पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे फार्मर आयडी मधील तांत्रिक दोष दुरुस्त करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु झाले आहे. सेंट्रल प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटचे तंत्रज्ञ याबाबत सातत्याने प्रयत्न करत आहेत.
फार्मर आयडी मधील नमुद गट क्रमांक, जमीनीचे क्षेत्र, गाव व तालुक्याच्या नावातील बदल, मोबाईल क्रमांकाची नोंद आदींबाबत अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या आहेत. ॲग्री स्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी व दोष निवारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शेतकऱ्यांना शासन योजनांचा विशेष करून कर्जमाफी, पिकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांसह डीबीटी वरील सर्व योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ज्यांचे फार्मर आयडी मध्ये दोष असतील अशा शेतकऱ्यांनी तातडीने तलाठी किंवा तहसिल कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून फार्मर आयडी दुरुस्तीसाठी अर्ज करावे. अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा आणि आधार संलग्न मोबाईल क्रमांक याची माहिती जोडून परिपूर्ण अर्ज करावेत असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. फार्मर आयडी मधील तांत्रिक दोष दुरुस्त करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
