पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाईची मागणी

24 तासांत चोर पकडणाऱ्या गेवराई पोलिसांनी 12 तासांत वाळूची गाडी सोडली
गेवराई, दि. 17 (वार्ताहार): गेवराई पोलिस ठाणे हद्दीत अवैध वाळू तस्करी फोफावली असून, “24 तासांत चोर पकडला” असा गवगवा करणाऱ्या गेवराई पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो 12 तासांत सोडला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
दि. 14 रोजीच्या नाईट पेट्रोलिंगच्या अधिकाऱ्यांनी एक अनधिकृत वाळूने भरलेला टेम्पो पकडला. हा टेम्पो पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या खाजगी डायरीत नोंद असलेला होता. संबंधित माफियाने अर्थ खाते सांभाळणाऱ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याला संपर्क साधला. त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने टेम्पो पकडला त्याला कॉल करून टेम्पो सोडण्यास सांगितले.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने टेम्पो सोडण्यास नकार दिल्याने कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित टेम्पो गेवराई पोलिस ठाण्यात कारवाईसाठी लावला. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता गेवराईचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी हा टेम्पो सोडला.
“24 तासांत चोर पकडला” असल्याचा गवगवा करणाऱ्या गेवराई पोलिसांनी 12 तासांत टेम्पो सोडल्याने याची चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात सुरू आहे. कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.



