क्राईम

पायल झांबरे प्रकरणावर एक नजर

Spread the love

मुलींंचा संसार वाचवण्यापेक्षा मुलगी वाचवणे महत्त्वाचे

 

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल झांबरे हिने भावाला शेवटचा मेसेज केला की, ‘माझ्या मृत्यूला माझी सासू जबाबदार आहे.’ यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती दिसून येते, जणू फक्त मुलीचे आणि घरच्यांचे नाव बदलले गेले आहे.

आयटी क्षेत्रात असलेल्या उच्चशिक्षित विवाहितेने माहेरून सोने, पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

आजकाल अशा घटना ऐकायला मिळाल्या की मला त्या मुलींच्या सासरच्या लोकांपेक्षा त्या मुलीच्या आई-वडिलांचा राग जास्त येतो. लोक काय म्हणतील? घटस्फोट झाला तर समाजातील आपली प्रतिष्ठा कमी होईल का? मुलीचा संसार वाचवायचा असतो, पण मुलीचा संसार वाचवता वाचवता मुलगीच नाही वाचली तर मग काय…? मुलीचा जीव गेल्यावर मग रडून काय उपयोग? ती जिवंत असताना तिच्या पाठीशी भक्कमपणे का उभे राहत नाहीत? आपल्याला माहिती असूनही पुन्हा पुन्हा का तिला त्या नरकात पाठवता?

तुम्ही जन्म दिला आहे… लग्न करून दिले याचा अर्थ असा होत नाही की आई-वडिलांचा मुलींवर काहीच हक्क नाही. लग्न लावून दिले तरी आयुष्यभर ती तुमची मुलगीच असणार आहे. मग तिला जर असा त्रास होत असेल तर सरळ तिला घटस्फोट देऊन घरी आणा. ज्या पैशाच्या, सोन्याच्या लालसेपोटी तिचा छळ होतोय तेच पैसे तिच्या नावावर बँकेत टाका किंवा तिला तिच्या आवडीनुसार स्वतःच्या पायावर उभे करा, जेणेकरून तिच्या जगण्याचे कोणालाही ओझे होणार नाही आणि घटस्फोटानंतरही समाजात स्वाभिमानाने जगायला तिला प्रोत्साहन द्या.

लोकांचे काय घेऊन बसता? लोक चार दिवस आपल्या विषयावर बोलतील, पण नंतर त्यांना दुसरा विषय मिळाला की हा विषय सोडून देतील. पण मुलीचा जीव गेला तर काय…? घटस्फोट देऊन आयुष्य पुन्हा जगता येते, पण गेलेला जीव पुन्हा आणू शकत नाही. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा मुलगी आणि तिचा जीव महत्त्वाचा आहे. समाजातील प्रतिष्ठेसाठी, मान-सन्मानासाठी मुलीचा जीव गेलेला कोणत्या आई-वडिलांना चालेल…?

मला आजही माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या आम्हा तिन्ही बहिणींच्या लग्नाच्या निवडीबाबत खूप अभिमान वाटतो. आम्ही तिघी बहिणी आहोत. वडील अ‍ॅग्री असिस्टंट म्हणून होते. आज आमच्यातून जाऊन चार वर्षे होत आली, पण लग्न झाल्यापासून आजपर्यंत एकाही जावयाने आमच्या आई-वडिलांकडे कशाचीच मागणी केलेली नाही. कधी माहेरी जायचे म्हटले तर प्रत्येकीचे यजमान स्वतः घेऊन जातात आणि स्वतः आणतात. थोडक्यात काय, तर लग्नासाठी फक्त पैसा महत्त्वाचा नसतो, तर माणुसकीही खूप गरजेची असते.

आजकाल आपण पाहतोय, पाहण्याच्या कार्यक्रमापासून समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी मोठेपणा सुरू होतो. त्यानंतर साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, वरात, लग्न, पहिले माहेरपण, धोंड्याचा महिना (अधिक मास), पहिली संक्रांत, पहिली दिवाळी, नवरात्रीचा फराळ, डोहाळे जेवण, फोटो-रील काढण्यासाठी वेगळेच पैसे मोजायचे… हे सगळे मुलीच्या घरचे मोठेपणा मिरवून करतात आणि समोरचा जावई तसाच हावरटासारखा घेत असतो. त्यात त्याची काही चूक नाही म्हणा. ही मुलीला आणि मुलीच्या आई-वडिलांना समजायला हवे. मुलीच्या हौसेच्या नावाखाली आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढवतो, हेच आजकाल माहेरच्यांना समजत नाहीये.

आपली मुलगी ज्या घरी लग्न करून दिली त्या ठिकाणी ती आनंदात असावी हीच पालकांची अपेक्षा असते. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की सासरच्या लोकांकडून मुलीचा छळ होतोय. कुटुंबातील बाकी सगळ्या सदस्यांचे सोडा, पण त्या नवऱ्याचे काय? जर तुम्हाला तुमच्या बायकोला चारचौघात, घरात तिची योग्य जागा ठेवून मान-सन्मान देता येत नसेल, तर त्या नवऱ्याला पुरुष तरी कसे म्हणणार…? समाज नाव ठेवेल म्हणून असल्या निर्दयी घरात आपल्या मुलीला ठेवणे खरंच योग्य आहे का? यात मुलीचे आई-वडीलही तितकेच दोषी ठरतील ना? मुली स्वतः हा निर्णय घेऊ शकत नाहीत का? मुली सुशिक्षित असल्याचा काय उपयोग? स्वतः इतके शिकून काय उपयोग?

मुलींनी अंदाज घेऊन सासरच्या लोकांमध्ये आणि मुख्य म्हणजे नवऱ्यामध्ये सुधारणा होत नसेल तर धैर्याने त्या घरातून बाहेर पडून यायचे. एक आयटी क्षेत्रातील मुलगी या सर्वांना विरोध करू शकत नाही, त्या निर्दयी माणसांतून बाहेर न पडता स्वतःच जीव देते, हे सुशिक्षित असलेल्या पायलकडून अपेक्षित नव्हते. हुंडा प्रतिबंधक कायदा देशात आहे, याची आठवण आपल्याला करून द्यावी लागत आहे, हे सगळ्यात मोठे दुर्दैव नाही का…? या दुर्दैवी समाज व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली.

समाजात आपली खोटी प्रतिष्ठा टिकवण्यापेक्षा, आपल्या मुलीचा संसार अशा मानसिक आणि शारीरिक छळात वाचवण्यापेक्षा आपली मुलगी वाचली पाहिजे, असा विचार करावा, अशी प्रत्येक आई-वडिलांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि म्हणूनच मुलीचे लग्न करताना घराणे किती मोठे आहे, मुलाकडचे किती पैसेवाले आहेत, हे पाहण्यापेक्षा त्या घरातील माणुसकी पहा, त्या मुलातील माणुसकी आणि चांगले गुण पहा. मग ते घर किंवा तो मुलगा थोडा कमी पैसेवाला असेल तरी काही हरकत नाही, जेणेकरून आपली मुलगी सासरी आनंदी राहील…

शेवटी, मुलीचा संसार टिकवण्यापेक्षा मुलगी टिकवणे महत्त्वाचे…!

[ शब्दांकन – सौ. सीमा अमोल होंडे (फरांडे) ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page