प्रतिष्ठित विधिज्ञाच्या ज्युनियरवर गुन्हा दाखल

गणपती मिरवणुकीत मद्यपान करून पोलिसाची कॉलर पकडली
गेवराई, दि. २६ (वार्ताहर) काल सायंकाळी गेवराई येथील अनेक गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना गेवराई न्यायालयातील एका प्रतिष्ठित विधिज्ञांच्या ज्युनियरने मद्यपान करून चक्क एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली व धुडगूस घातला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक तपासणी करून मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेवराई शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान मोढा नाका परिसरात गणेश मिरवणुकीत एक इसम धिंगाणा घालत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. तात्काळ सदर ठिकाणी गेवराई पोलिसांचा फौजफाटा गेला व सदरील इसमाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर इसमाने पोलिसांचे एकही न ऐकता उलट त्यांनाच “मी वकील आहे, तुम्ही नोकरी कशी करता तुम्हाला बघून घेतो,” असे म्हणून चक्क एका सपोनिंची कॉलर पकडली व कानशिलात लगावली.
तसेच यापूर्वी देखील या इसमाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीला नोंद घेण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून ठराविक वकिलाची दुकानदारी गेवराई पोलीस ठाण्यात सुरू असून ठाणे हे दलालांच्या विळख्यात आहे, ही बाब देखील अत्यंत खेदजनक आहे. वरिष्ठांनी याठिकाणी लक्ष घालून गेवराई पोलिसांना शिस्तीचा धडा देण्याची आवश्यकता आहे.


