क्राईम

गेवराई न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

Spread the love

२.४० कोटींच्या कथित गैरव्यवहार  १५ वर्षांनंतर संदेश पोतदार यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष मुक्त

 

गेवराई दि ५ (वार्ताहार ) – येथील ‘जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित’ मधील तब्बल २ कोटी ४० लाख ९५ हजार ४७० रुपयांच्या कथित गैरव्यवहार आणि अपहार प्रकरणात गेवराई न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. माननीय न्यायाधीश एच. एम. मोमीन यांच्या न्यायालयाने संदेश पोतदार यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या फौजदारी खटल्याचा निकाल लागल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणी पतसंस्थेचे संचालक पठाण अथरखाँ फकरुल्लाखाँ यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत पतसंस्थेच्या कारभारातील कर्जप्रकरणे, कर्ज मंजुरी, विविध खात्यांमधून झालेली आर्थिक उलाढाल आणि संस्थेच्या रकमेच्या अपहाराबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ४०६, ४०७, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७९ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियोग पक्षाकडून खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. बी. एम. सानप यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या खटल्यात संदेश पोतदार यांनी सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्यावर विविध आर्थिक व्यवहारांचे आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. खटल्यातील कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्जप्रकरणे आणि साक्षीदारांच्या जबाबांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.बचाव पक्षातर्फे संदेश पोतदार यांनी स्वतःचा युक्तिवाद स्वतःच मांडला, तर अन्य आरोपी प्रभाकर कानगुडे यांच्यावतीने ॲड. गणेश करांडे, तर केशव तांदळे आणि योगीराज साळवे यांच्यावतीने ॲड. सुतार आणि ॲड. काळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

अखेर प्रदीर्घ सुनावणीनंतर अभियोग पक्षाला आरोपींविरुद्धचे आरोप आवश्यक त्या कायदेशीर पुराव्यांसह सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने संदेश पोतदार, प्रभाकर कानगुडे, केशव तांदळे आणि योगीराज साळवे या सर्वांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या २.४० कोटींच्या प्रकरणावर अखेर न्यायालयीन पडदा पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button

You cannot copy content of this page