गेवराई

कर्तृत्वान महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची संस्कृती

Spread the love

उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची बदनामी खपवून घेणार नाही – आ. विजयसिंह पंडित

 

गेवराई, दि. 4 (वार्ताहार) – महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई अजित पवार यांच्याविरोधात करण्यात येत असलेली वैयक्तिक टीका आणि बदनामीचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आ. विजयसिंह पंडित यांनी दिला आहे. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती असून, राजकीय वैरातून महिला नेतृत्वाला लक्ष्य करण्याची प्रवृत्ती निषेधार्ह असल्याचे सांगून आ. विजयसिंह पंडित यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या कृतीचा निषेध केला आहे.

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई अजित पवार यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिकेचा समाचार आ. विजयसिंह पंडित यांनी घेतला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून सुनेत्राताई पवार यांनी पक्षाची धुरा, राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आणि दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा कारभार समर्थपणे सांभाळला आहे. त्यांच्या जनसेवेप्रती असलेल्या निष्ठेची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेत असताना विरोधकांकडून त्यांच्यावर वैयक्तिक टीका होत असल्याची खंतही पंडित यांनी व्यक्त केली.

राजकीय प्रश्नांवर लढण्याचे धैर्य नसल्याने काँग्रेसने आता वैयक्तिक आरोपांचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप करत स्वतःला महिला सन्मानाचे पुरस्कर्ते म्हणवणाऱ्या काँग्रेसने दुसऱ्या पक्षातील सक्षम महिला नेतृत्वाचा सन्मान राखावा, असा टोला त्यांनी लगावला. विचारांचा सामना विचारांनी आणि कामाचा सामना कामाने व्हावा. महिलांवर वैयक्तिक टीका करून राजकारण करण्याची संस्कृती महाराष्ट्राने कधीच स्वीकारलेली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या सुनेत्राताई पवार यांच्याबाबत यापुढे कोणीही अवमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही आ. विजयसिंह पंडित यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page