शहरानजिक वाळूच्या टेम्पोची धडक

गेवराई पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाळू तस्करीचा आणखी एक बळी
गेवराई, दि. 18 (वार्ताहार): गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील अवैध वाळू तस्करी आता दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत आहे. राजपिंप्री या गावाकडून आपल्या खाजगी कामासाठी दोन तरुण आपल्या मोटारसायकलवर चालले होते. त्यांना शहरानजिक असणाऱ्या जमादारनिच्या पुलाजवळ वाळूने भरून चाललेल्या टेम्पोने जोराची धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा बळी गेला. ही घटना दि. 18 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गेवराई पोलिस ठाणे हद्दीत पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या आशीर्वादाने सध्या वाळू माफियांचे कल्याण होत असल्याचे चित्र आहे. दररोज हजारो ब्रास वाळूची चोरी गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून केली जाते. तसेच या वाळू तस्करीला गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते.
कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत हे वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसे आदेशही त्यांनी ठाणेदारांना दिले आहेत. परंतु या आदेशाला गेवराई पोलिस जुमानत नाहीत अशी प्रचिती पहायला मिळत आहे.
आपल्या गावाकडून कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा दिवसा वाळूच्या गाडीने बळी घेतला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भूषण भागवत पानखडे (वय 15) असे या तरुणाचे नाव असून पुढील तपास पोलिस करत आहेत. या गंभीर बाबींची दखल कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांनी घ्यावी व दोषींविरुद्ध शासन नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



