रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर अनुभवी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर
मुंबई, दि. 4 (वार्ताहार): राज्य महिला आयोगाच्या राज्य सरकारने अखेर अत्यंत अनुभवी आणि कणखर नेतृत्वाची निवड केली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा चड्ढा-बोरवणकर यांची या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. बोरवणकर यांच्या नियुक्तीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
कोण आहेत मीरा बोरवणकर?
1981 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. पोलीस दलात आपल्या धाडसी आणि परिणामकारक कामगिरीमुळे त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ अशी ओळख मिळाली आहे.
डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले. मुंबईतील माफियाराज_ संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.जळगाव सेक्स रॅकेट:1994 साली जळगावमध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. याकूब मेमन फाशी मुंबईच्या जेलमध्ये पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल) होत्या.तसेच अबू सालेम प्रत्यार्पण:परदेशी पळून गेलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगारांचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या.
नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेनंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांनीच बोरवणकर यांच्या नावाची शिफारस केली होती.
आता आयोगाकडून महिलांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करणे, अत्याचारग्रस्त महिलांना जलद न्याय मिळवून देणे, महिला सक्षमीकरणाच्या शासकीय उपक्रमांना गती देणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील.
पंजाबच्या फाजिल्का येथे जन्मलेल्या मीरा बोरवणकर यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फाजिल्का येथे आणि पुढील शिक्षण जालंधर येथे झाले. त्यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ’ नावाचे इंग्रजी पुस्तकही लिहिले आहे.
प्रशासकीय पकड आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाच्या कामकाजात अधिक स्पष्टता आणि वेग येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.