अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे २०१६ च्या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात
गेवराई, दि.३१ ( वार्ताहार ) ः- उमापूर महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी सन २०१६ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळत नसल्या प्रकरणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी वेगवेगळ्या पातळीवर पाठपुरावा केला. उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेत न्यायालयाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे आदेश पारीत केले, मात्र बँक आणि विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात हे आदेश आव्हानीत केले. अमरसिंह पंडित यांनी सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडल्यामुळे बँक आणि विमा कंपनीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी अमरसिंह पंडित यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात बँकेविरोधात अवमान याचिका दाखल केली. अमरसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दि.३१ मार्च रोजी उमापूर महसुल मंडळातील १५६ शेतकऱ्यांना ७२.९४ लाख रुपये नुकसान भरपाई अदा झाली आहे. मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या यशामुळे अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सन २०१६ च्या खरीप हंगामासाठी उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत ४९.२२ लाख रुपये विमा हप्ता भरूनही केवळ बँक कर्मचाऱ्याच्या चुकीच्या नोंदीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विषयी अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत आवाज उठविला, सभागृहातील आश्वासना नंतर बँक, विमा कंपनी आणि शासन प्रतिनिधी यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या मात्र त्यातून मार्ग निघाला नाही. शेवटी अमरसिंह पंडित यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल केली. न्यायालयाने ७ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बँकेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली नाही.
न्यायालयाने दिलेली मुदत पूर्ण होण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. अमरसिंह पंडित यांनी ॲड.दिलीप तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात खंबीरपणे मांडली, सर्वोच्च न्यायालयाने बँक आणि विमा कंपनी यांची याचिका फेटाळून लावली. दरम्यान बँकेने पुन्हा उच्च न्यायालयात पुर्ननिरीक्षण याचिका दाखल करून वेळकाढूपणा केला. अमरसिंह पंडित यांनी शेवटी उच्च न्यायालयात बँकेविरोधात अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणात सुनावणी सुरु असताना पिक विमा कंपनीने विमा हप्त्याची रक्कम व्याजासह बँकेला अदा केली आणि मंगळवार, दि.३१ मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेने या प्रकरणातील १५६ शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजासह पिक विमा नुकसान भरपाई पोटी ७२ लाख ९४ हजार ४९९ रुपये वाटप केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत. सिनिअर काऊन्सिल ॲड.नंदकुमार खंदारे आणि ॲड.विलास सावंत यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली आहे.
बँक आणि विमा कंपनी सातत्याने या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहेत, उमापूरच्या शाखा व्यवस्थापकांनी न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात अतिशय चुकीची माहिती दिली आहे. १५६२ शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरणा केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व्याजासह सुमारे ५ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी पहिल्यापासून आपली भुमिका होती. आज १५६ शेतकऱ्यांना सुमारे ७३ लाख रुपये मिळाले आहेत याचे समाधान असून उर्वरित शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले आहे.