गेवराई मतदारसंघात शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस शिवसेना ही मजबूत होत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे. वास्तविक पाहता बागपिंपळगावचा एकही शिवसैनिक राष्ट्रवादीत गेला नाही, मात्र स्वतःच्याच कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवेश दाखवून, राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते अमरसिंह पंडितांना फसवत असल्याचा घणाघाती आरोप माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनी केला आहे.
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगावच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याच्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आल्या आहेत. याचा समाचार घेताना जि प चे माजी सभापती पंढरीनाथ लगड म्हणाले की, बदामराव पंडित यांनी कधी जनतेशी लबाडी केली नाही. कोणाचा उस बांधावर टाकला नाही की मापात कधी पाप केले नाही. त्यामुळेच तांत्रिक दृष्ट्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी नसताना आणि ऐनवेळी अपक्ष निवडणूक लढवूनही 52 हजार मते घेऊन बदामराव पंडित यांनी आपली स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. हीच ताकद दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात येत आहेत. यापैकी कित्येकांनी स्वतःहून शिवसेनेत जाहीर प्रवेश केले आहेत आणि येणाऱ्या काळातही हे प्रवेश होतच राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. शिवसैनिकांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, यासाठी हुकूमशाहीची कास धरणारे नेते कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत. कामाची ऑर्डर देऊन लालच देत आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु याला स्वाभिमानी शिवसैनिक भीक घालत नाही. मात्र दुसरीकडे लोकनेते बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पैशासाठी नाही किंवा दबावापोटी नाही तर प्रेमामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने वर्तमानपत्रात बातम्या देऊन बागपिंपळगावच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा गवगवा केला. मात्र आमचा येथील एकही शिवसैनिक राष्ट्रवादीत गेलेला नाही असे ठासून सांगत पंढरीनाथ लगड म्हणाले की, गतवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेना नंबर एकला राहिली आणि या वेळच्या निवडणुकीतही बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच गेवराई तालुक्यात एक नंबर वर राहणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...