
70 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
गेवराई, दि. 18( वार्ताहर )गेवराई तालुक्यातील म्हाळजपिंपळ गाव येथे केन्या वाळूचे हायवा अनधिकृतपणे चालविण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठी संघटनेचे अध्यक्ष तथा तलाठी राजेंद्र मोराळे यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील म्हाळजपिंपळ गावात अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी केन्या व हायवा वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी तलाठी मोराळे यांनी तक्रारदाराकडे 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून आज गेवराई शहरातील बेदरे कॉम्प्लेक्स परिसरातील खाजगी कार्यालयात 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तलाठी राजेंद्र मोराळे यांना रंगेहात पकडले.या कारवाईमुळे गेवराईतील महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.


