क्राईम

राक्षसभूवन वाळू घोटाळ्यात पोलिसांनी आवळला फास

Spread the love

दोन आरोपींना अटक तर एकाची शरणागती 

 

गेवराई, दि. 23 (वार्ताहर) तालुक्यातील कथित राक्षसभूवन वाळू घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने फास आवळला असून, काल दुपारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर आज (दि. 23 ऑगस्ट) रोजी एक आरोपी पोलिसांना शरण आला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राक्षसभूवन येथे जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता घरकूल धारकांच्या नावे 20 हजार ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. गेल्या आठवडाभरात या गुन्ह्यातील सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अटक केलेल्या आरोपींनी तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांची नावे देखील समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, काल (दि. 22 ऑगस्ट) रोजी शारुख पठाण व यासीन तांबोळी यांना हिरापूर परिसरातून अटक करण्यात आली असून, सोहेल सौदागर हा पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page