क्राईम

आर्थिक गुन्हे शाखेला मोठे यश

Spread the love

राक्षसभूवन वाळू घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

 

गेवराई, दि. 21 ( वार्ताहर ) तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या राक्षसभूवन येथील घरकूल वाळू घोटाळ्या प्रकरणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशान्वये चकलांबा पोलिस ठाण्यात 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.

या तपासात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले असून, दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गेवराईतून दोन आरोपींना अटक केली असल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राक्षसभूवन येथे घरकूल धारकांच्या नावे 700 पेक्षा जास्त खेपा मारून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार आ. विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर बोगस ई-टीपी व ई-टीएस मोजणीच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशी करून 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश गेवराई महसूल प्रशासनाला दिले होते. त्यानंतर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार केले होते. सदर गुन्ह्यात अनेक वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप एकही वाहन जप्त करण्यात आलेले नाही.

दरम्यान, दि. 20 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराने वाळू घोटाळ्यातील आरोपी बीड-जालना रोडवरील हॉटेल निसर्ग परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला दिली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दादासाहेब माळी व अशोक चक्कर यांना मोठ्या शिताफीने अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष शेजाळ, पो.उपनि. खटके, पो.ह. गोरख राठोड, पो.शि. भाऊसाहेब चव्हाण, पो.शि. हनुमान इंगोले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page