उमापुरकरांचे सुंदर नियोजन ; शिवाजी महाराजांनी केले कौतुक

श्रीक्षेत्र नारायणगडाच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता; लाखोंचा जनसागर उसळला
गेवराई : दि ७ ( वार्ताहार )मराठवाड्यात थोर संत महात्म्यांनी जन्म घेवून जगाच्या उद्धारासाठी काम करुन समाजाचे हित साधले. तर सर्व जाती-धर्माला सोबत घेवून चालण्याची श्री क्षेत्र नारायणगडाची परंपरा आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज यांनी केले. श्री.क्षेत्र नगद नारायण गडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह गेवराई तालुक्यातील उमापुर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी लाखो भाविकांचा जनसागर महाप्रसाद घेण्यासाठी लोटला होता.श्री क्षेत्र नगद नारायण गडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांचे ‘नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ।।१।। माया उपजलीं तेथें । ठेवीं मज आणीं येथें ।।२।।’ या अभंगावर भव्य काल्याचे हरीकीर्तन संपन्न झाले. दरम्यान यावेळी माजीमंत्री आ.धनंजय मुंडे, खा. निलेश लंके , आ.विजयसिंह पंडित यांनी सप्ताहाला भेट दिली तर कीर्तनप्रसंगी व्यासपीठावर श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, माजीमंत्री बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, उत्तराधिकारी संभाजी महाराज, नारायण महाराज, शिवाजी म. गिरी, माजी सभापती युधाजित पंडित, बप्पासाहेब तळेकर, ॲड.महादेव तुपे , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नवले, युवा उद्योजक गणेश नलावडे, युवा नेते रोहित पंडित, हभप हरिदास जोगदंड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अमोल करांडे, मुकुंद बाबर यांसह संत-महंत व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गडाचे टाळकरी, वारकरी, गायक , वादक, भजनी मंडळ, विणेकरी तसेच भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांची सेवा केल्यानंतर नगद प्रसाद मिळतो. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांनी केलेल्या नियोजनामुळे हा सप्ताह न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा झाला आहे. सर्वांनी एकत्र येवून केला जातो त्याला काला असे म्हणतात. संतांच्या आशीर्वादाने काला घ्यावा तर स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराजांच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद आहे. त्यांच्या आशीर्वादाने मला त्यांच्या जाग्यावर बसवलं तर सर्वांना सुख मिळावे यासाठी नारळी सप्ताहाच्या धर्म मंडपात ही संतांची प्रतिज्ञा असते. प्रत्येकाने समाजात वावरताना लीन आणि नम्र रहा आणि साधुसंतांचा आशीर्वाद प्राप्त करा. तर तरुणांनी या भक्ती मंडपात येवून भक्तीमय वातावरण अनुभवले , हा भक्ती सोहळा भव्य दिव्य पार पडला तर प्रत्येकाने गाईची आणि आईची सेवा करावी व रामकृष्ण हरी हा नामजप करावा असा मौलिक सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला. या सप्ताहात उमापूर ग्रामस्थांसह मारोतीचीवाडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी तन-मन-धनाने सहकार्य केल्याने नारळी सप्ताह मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांचा जनसागर उसळला होता.
श्री क्षेत्र नारायणगडाच्या ७४ व्या भव्य नारळी सप्ताहासाठी उमापुर, मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थ गेल्या सहा महिन्यांपासून नारळी सप्ताहाच्या नियोजनाला लागलेले होते. भव्य धर्म मंडप म्हणजे स्वायत्त कल्याणचे ठिकाण आहे. भव्य सोहळा उमापुर करांनी सार्थकी लावला. आज तुम्ही सर्वांनी तन मन धनानी सेवा केल्याने या वर्षीच्या ७४ व्या नारळी सप्ताहाला आगळेवेगळे स्वरुप प्राप्त झाले . सप्ताह काळात आलेल्या सर्व भाविकांना भोजन आणि पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गावातील लहान मुलांपासून महिला तसेच आबाल वृद्धांपर्यंत सर्व जण भाविकांच्या सेवेत हजर होते. त्यामुळे सुंदर नियोजन केल्याबद्दल महंत शिवाजी महाराजांनी उमापुरकरांचे कौतुक केले.
श्रीक्षेत्र नारायणगडाचा यंदाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात उमापुर येथे संपन्न झाला तर पुढच्या वर्षीचा ७५ वा भव्य अमृत महोत्सवी सप्ताह सन -२०२७ ला श्रीक्षेत्र नारायणगड येथे येथे होणार असल्याची घोषणा गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनानंतर यावेळी बोलताना केली.
