चाळीस वर्षीय युवकाची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या
गेवराई : दि ९ ( वार्ताहार ) चाळीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.८ एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील सुशी तांडा येथे घडली. गोरख शांतीलाल राठोड (वय ४० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून कर्जबाजारीपणामुळे मुलीचे लग्न कसे करायचे या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून समजते आहे. तर या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गोरख शांतीलाल राठोड (वय ४०) राहणार सुशी तांडा (ता.गेवराई जिल्हा बीड) हे ऊसतोडणी तसेच शेती करुन आपला उदरनिर्वाह भागवत होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलीचा नुकताच विवाह जमला होता तर पहिलेच कर्जबाजारी असल्याने मुलीच्या विवाहासाठी पैसे कुठून आणायचे या आर्थिक विवंचनेतून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समजते आहे. मागील काही वर्षांतील डोक्यावरील कर्जाचा वाढत चाललेला डोंगर आणि मुलींचे लग्न या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समजते आहे. तर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.