April 19, 2025

नवाब मलिकांची भूमिका संघासारखी, मुस्लिम आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

           नागपूर: दि 25 ( वार्ताहार ) 

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका योग्य नाही. वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. मात्र, मलिक हे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत. ते वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका संघासारखी आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशी संघाची भूमिका आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. राष्ट्वादी आणि भाजपचे संबंध जगजाहीर आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असंही ते म्हणाले.मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावं. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजे. त्याबाबतची जागृती केली पाहिजे. इम्पिरिकल डेटा का गोळा केला नाही याचा जाब विचारला पाहिजे. सरकारची पोलखोल केली पाहिजे. गोवारी समाजासारखी अवस्था होऊ नये असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

              राजकीय भूमिका घ्या

आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता जिल्हा पातळीवर मोर्चे काढण्याची आमची तयारी सुरू आहे. आता ओबीसींना आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने आमच्याकडे मतं मागायला येऊ नये असे बोर्डच ओबीसींनी आपल्य घरावर लावले पाहिजे. मत हवे असेल तर आमचं आरक्षण आम्हाला परत करा, अशी मागणी ओबीसींनी धरली पाहिजे. ओबीसींना आरक्षण मिळावं आणि या लढ्याला वेग मिळावा म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

            चारही पक्षांकडून फसवणूक

सुप्रीम कोर्टातील निर्णय असाच राहिला तर आता ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. पुढे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षणही जाऊ शकतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चारही पक्ष ओबीसींची फसवणूक करत आहेत. त्यामुळे ओबीसी ने स्वतःची लढाई स्वतः लढली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *