राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून कर्मचारी दोन दिवसांच्याबँक संपावर
नवी दिल्ली दि 16 :- वार्ताहार
राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आजपासून या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संपावर गेल्यास त्याचा मोठा परिणाम हा बंँकेच्या दैनंदिन कामावर होणार आहे. संपादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्व शाखांमध्ये पर्यायी कामकाजाची व्यवस्था निर्माण केली आहे.
संप कशासाठी ?
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.
सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल
आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार बँकेंचे कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे. शनिवारी देखील देशातील अनेक बँकांना सुटी आहे. तर रविवारी विकेंड असल्यामुळे बँकांना सुटी राहिल. आजपासून सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता असल्याने, बँकिंग व्यवहार ठप्प होऊ शकतात त्यामुळे ग्रहाकांच्या अडचणी वाढणार आहेत.